Jehangir Art Gallery : शुभ्र काही जीवघेणे…

कृष्णलीलांवर आधारित अनेक संगीत - नृत्य कार्यक्रमात हेमामालिनी यांनी आपली कला आजवर श्रद्धापूर्वक सादर केली. प्रणिताची सर्व चित्र श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित होती. तिने चितारलेला सावळा एका वेगळ्या आणि स्वतंत्र शैलीतील होता. त्यामुळे याचे उद्घाटन हेमामालिनी यांनीच करावे, असे आम्हा सर्वांना वाटत होते.

0

मथुरा येथून खासदार म्हणून निवडून येणाऱ्या आणि भारतीय चित्रपट (movie) सृष्टीतील एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री हेमा मालिनी (Actress Hema Malini) यांच्या मुंबई येथील घरात 4 वर्षांपूर्वी आम्ही बसलो होतो. प्रणिता बोरा, तिचे वडील प्रवीण, भाजपचे संघटन सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी असे काहीजण सोबत होतो. हेमा मालिनी यांना एका विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचे होते. जहांगीर आर्ट गॅलरी (Jehangir Art Gallery) मध्ये प्रणिताचे चित्र प्रदर्शन लागणार होते. तिचे उद्घाटन हेमामालिनी यांनी करावे, अशी आमची इच्छा होती.

हे देखील वाचा : ग्रामपंचायत निवडणूक : आम्हीच नंबर वन; राजकीय पक्षांचे दावे, प्रतिदावे

मथुरा आणि श्रीकृष्ण यांचे नाते अजोड आहे.  कृष्णलीलांवर आधारित अनेक संगीत – नृत्य कार्यक्रमात हेमामालिनी यांनी आपली कला आजवर श्रद्धापूर्वक सादर केली. प्रणिताची सर्व चित्र श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित होती. तिने चितारलेला सावळा एका वेगळ्या आणि स्वतंत्र शैलीतील होता. त्यामुळे याचे उद्घाटन हेमामालिनी यांनीच करावे, असे आम्हा सर्वांना वाटत होते. प्रणिताची काही  चित्र पाहिल्यावर हेमा मालिनी  यांनी  विचारले ,- ” प्रणिता, तू
दिल्ली किंवा मुंबईमध्ये का राहत नाही ? तुझ्या  कामाचे आणि दर्जाचे चीज  अहमदनगर  सारख्या छोट्या गावात जसे होणार ?  “

मग आम्हाला त्या म्हणाल्या,
” प्रणितामध्ये महान चित्रकाराचे आणि दिव्य प्रतिभेचे अंश दिसत आहेत. पण त्याची कदर आणि खरी किंमत ही  फक्त काही मोठ्या महानगरातच होऊ शकते.”

यावर काही क्षणांचा पॉझ घेऊन प्रणिताने सांगितले की, ” श्रीकृष्णाची चित्र चितारताना मी एका वेगळ्या भावावस्थेत (ट्रान्स) जाते. चितारल्या जाणाऱ्या प्रसंगाची मी एक अदृश्य साक्षीदार असते.
जे मी पाहत असते तेच चित्रातून व्यक्त करताना मला मनस्वी आनंद मिळतो. ती प्रत्यक्ष श्रीकृष्णाने केलेली माझी कदर आणि किंमत असते.माझ्यासाठी तीच या प्रक्रियेचा परतावा आहे.त्यासाठी मी अहमदनगर मध्ये असल्याने काही फरक पडत नाही. माझा कृष्णाप्रती असणारा भाव व्यक्त करणे ही खरेतर माझी गरज आहे.

चित्रातील भाव  संवेदनशील लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचला तर आनंद वाटतो जहांगीर मधील  प्रदर्शनात जर कोणाच्या हृदयाला हा भाव स्पर्शला ,  त्याची काही किंमत कोणी दिली ,तर ते सर्व स्नेहालय सारख्या वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मी अर्पण करणार आहे. मी आणि श्रीकृष्ण यांच्यात एक अद्वैत आहे. ते तसे राहण्यातच मला कलाकार  आणि माणूस म्हणून आनंद वाटतो…,”, प्रणिताचे हे उत्तर ऐकून हेमा मालिनी अक्षरशः विस्मित झाल्या. गणिताच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण त्यांनी लगेचच स्वीकारले. त्या आल्या सुद्धा. प्रणीताच्या कलेचा सखोल आढावा त्यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात घेतला. आपली कला आणि तिचे जगाकडून मिळणारे मोल कृष्णार्पण करणाऱ्या प्रणिताचा आज जन्मदिन आहे.


 वाशी (नवी मुंबई) येथे प्रख्यात चित्रकार भरत दाभोळकर यांनी आज प्रणिताला घरी  बोलावले आहे. वाढदिवस हे निमित्त पण तिच्या कृष्ण – चित्रकलेला जाणून घेण्यात जागतिक स्तरावरील चित्रकारांनाही रस आहे, हे या निमित्ताने अधोरेखित होते. बालपणापासून मी प्रणिताला ओळखतो. कारण तिचे वडील प्रवीण हे स्नेहालयाचे कार्यकर्ते आणि पालक. या मनस्वी मुलीने आयुष्यात जे पटले ते झपाटून केले.


आई, वडील, बहीण अगदी वृद्ध आजीला सुद्धा प्रणिताचे नेहमीच कौतुक वाटले. संस्कारशील जैन – मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या, वाढलेल्या प्रणिताने वरोरा येथे  आनंदवनात जाऊन वंचितांशी नाते जोडले. सोमनाथ येथील श्रमसंस्कार छावणीत बहीण पूर्वाला घेऊन ती नियमितपणे येत राहिली. स्नेहालेच्या सर्व युवा शिबिरांमध्ये आणि युवा छावण्यांमध्ये ती श्रमदानापासून ते स्वयंपाकापर्यंत सर्व कामात हिरीरीने सहभाग घेत राहिली. धनश्री खरवंडीकर यांच्याकडे ती गाणं शिकली.मग कितीतरी वर्ष स्नेहालय आणि संलग्न संस्थांच्या कार्यक्रमात स्वागत गीतापासून ते पसायदानापर्यंत अप्रतिम सुरावटीत प्रणिता गायली.

गेली एक दशक मात्र तिला चित्रकलेने झपाटले. या छंदात तिच्या स्वभावाप्रमाणे ती इतकी रममाण झाली की, तोच तिचा श्वास बनला. प्रवीण यांनी तिला स्वतंत्र जागा घरासमोरच घेऊन स्टुडिओ थाटून दिला. येथे ती अहोरात्र तिच्या मनातील श्रीकृष्ण चित्रातून साकारत असते. तिची कला पाहण्यासाठी लेखक अच्युत गोडबोले यांच्यापासून ते जागतिक कीर्तीचे चित्रकार संजय भट्टाचार्य, सुनील लाहिरी, भरत दाभोळकर आदी येत असतात .ही यादी खूपच मोठी आहे. प्रणिताची बांधिलकी सामाजिक चळवळी आणि संघटनांशी आहे. ती पुणे येथे शिकायला गेली, तेव्हा राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसाठीच्या वसतिगृहात राहिली. तिच्या वडिलांनीही आपली ऐपत आहे, चांगल्या फ्लॅटमध्ये राहा, मजा कर, आमची प्रतिष्ठा धोक्यात येते, लग्नात अडचणी येतील,असले तिला कधी काही म्हटले नाही. जेव्हा जन लोकपालचे आंदोलन चालू होते ,तेव्हा प्रणिता टोपी घालून तिरंगा झेंडा घेऊन आमच्याबरोबर असायची. हे सर्व ( आमचे ज्येष्ठ स्नेही आणि महान लेखक अंबरीश मिश्रा यांनी म्हटल्यानुसार) शुभ्र परंतु जीवघेणे आहे.  प्रणिताला जसे जगायचे आहे आणि जसे अनुभव घ्यायचे आहेत, त्यासाठी तिची पाठराखण करणारे तिचे कुटुंब ही तिच्यासाठी अनमोल ईश्वरी देणगी आहे.

तिच्याकडे येणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आणि भरत दाभोळकर, संजय लाहिरी (रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकार करणारा कलाकार ),संजय भट्टाचार्य यांना ती विविध सामाजिक संस्थांच्या भेटी घडवते. तिच्यामुळे कला साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे अहमदनगर शहराशी नाते जुळले. नगरचे महात्म्य वाढविण्यात तिचे योगदान अनमोल आहे. भारताच्या कला अकादमीने भारतातील  श्रेष्ठ कलाकारांच्या शिबिरात तिला निमंत्रित केले होते. प्रणिताच्या चित्रांची तारीफ भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही केली.  राष्ट्रपती भवनातही तिचे चित्र झळकते आहे , ही नगरकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

लवकरच प्रणिताची चित्र सात समुद्र ओलांडून प्रदर्शनासाठी जाणार आहेत. तेव्हा अहमदनगर म्हणजे भारताचे व्हेनिस आहे की काय अशी शंका दर्दीना येईल. प्रणिताचे स्नेहालयाशी आणि सर्व सामाजिक संस्था संघटनांशी असणारे नाते आम्हा सर्वांना प्रेरणादायक आहे. तिच्याकडे पाहून कोणीही म्हणेल आय लव नगर….


डॉ.गिरीश कुलकर्णी,
[email protected]

M.8788291401

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here