आमच्याविषयी

२०१७ साली फेसबुक पेजद्वारे सोशल मीडियाच्या विश्वात पहिले पाऊल ठेवणाऱ्या 'I Love नगर' चळवळीला, अहमदनगरकरांचादेखील अगदी उस्फुर्त व उदंड प्रतिसाद लाभला आहे. फेसबुक नंतर, इंस्टाग्राम, युट्युब, ट्विटर, मोबाईल अॅप व व्हॉट्सअॅपद्वारे, अहमदनगरवर जीवापाड प्रेम करणाऱ्या ३ लाखापेक्षा अधिक अहमदनगरकरांचे एक कुटुंब तयार झाले आहे, हे आता आम्ही अगदी अभिमानाने सांगू शकतो. ऑनलाईन पुढाकारांसोबतच, विविध ऑफलाईन उपक्रमांच्या आयोजनात देखील 'I Love नगर' सदैव अग्रभागी असते.

केंद्र शासनाच्या डिजिटल भारत अभियानापासून प्रेरणा घेऊन अहमदनगर जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने, 'I Love नगर' या बहुउद्देशीय उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नवनवीन डिजिटल पर्यायांच्या माध्यमातून सर्व अहमदनगरकरांना एकमेकांशी जोडून ठेवणे व व्यक्त होण्याचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे त्यामुळेच सहज शक्य झाले.

'व्होकल फॉर लोकल' चळवळीला दृष्टीक्षेपात ठेऊन, स्थानिक व्यावसायिकांना उभारी देण्याचा आमचा मानस आहे. 'I Love नगर' मोबाईल अॅपमधील 'सिव्हिक इश्यू' या सुविधेद्वारे, लोकप्रतिनिधींच्या मदतीने नागरी समस्यांवर कायमस्वरूपी उपाय उपलब्ध करून देणाऱ्या नव्या बदलाची मुहूर्तमेढ आम्ही रोवली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यटन, औद्योगिक, साहित्यिक, आरोग्य, कला, अर्थ व इतर क्षेत्रांना पूरक वातावरणासाठी आम्ही आगामी काळातदेखील असेच प्रयत्नशील आहोत.