10th Exam | कर्जत: आजपासून (ता.२०) दहावीची परीक्षा (10th Exam) सुरू झाली असून मराठीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला आहे. कर्जत तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी ३ हजार ५१८ विद्यार्थी बसले असून एकूण १३ परीक्षा केंद्र स्थापन केले असल्याची माहिती कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांनी माहिती दिली.
या सर्व परीक्षा केंद्रावर शुक्रवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांनी वर्ग खोली आणि परीक्षार्थीचा क्रमांक शोधण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी मदत केंद्रे स्थापन केले होते. त्यामुळे परीक्षार्थिंना सहज आपला आसन क्रमांक मिळवणे सोयीस्कर ठरले.
अवश्य वाचा- जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी
प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्हीची व्यवस्था (10th Exam)
परिक्षार्थी विद्यार्थ्यांची सर्व तपासणी करूनच त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात असल्याने मराठी विषयाचा पेपर सुरळीत पार पाडला. कर्जत तालुक्यात ३ हजार ५१८ विद्यार्थी दहावी परीक्षेसाठी बसले असून यासाठी १३ केंद्रावर १४१ वर्ग खोल्या आरक्षित केले आहे. प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्हीची व्यवस्था केली असून गुगल लिंकद्वारे जिल्हा पातळीवरून प्रत्येक वर्गावर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती कर्जतचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. यासह संवेदनशील केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण तसेच सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी मुक्त परीक्षेची शपथ दिली आहे. तसेच परिक्षा काळात जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद आहिल्यानगर यांच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवरून भरारी पथकांची नेमणूक प्रत्येक केंद्रावर बैठे पथक नियुक्त केले आहे.



