12 Jyotirlinga : नगर : पाराशर ऋषींच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेले पारनेर (Parner) हे पुरातन गाव प्रती काशी म्हणून ओळखले जाते. येथील बारा ज्योतिर्लिंगांची (12 Jyotirlinga) मंदिरे शिवभक्तांची श्रद्धास्थाने आहेत. श्रावण महिन्यातील प्रती दिनी ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा पिढ्यान् पिढ्या जपली गेली आहे. सध्या श्रावण (Shravan) महिना सुरू असल्याने ही शिवालये भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत. नोकरी व व्यवसायानिमित्त परगावी गेलेले पारनेरकर श्रावणाचे महत्त्व ध्यानी घेऊन गावी परतल्याने जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पांचे फड रंगू लागले आहेत.
नक्की वाचा: पाथर्डी तालुक्यात आकाशात फिरली ड्रोन सदृश वस्तू
पारनेरमधील बारा ज्योतिर्लिंगांची दर्शन
पारनेरमधील बारा ज्योतिर्लिंगांची दर्शन यात्रा गणेश खिंड येथील श्री भालचंद्र गणेशापासून सुरू करू या. गणेश पुराण कथासारमधील ६१ व्या अध्यायात या स्थळाचे महत्त्व वर्णिलेले आहे. भारद्वाज ऋषींचे सुपुत्र भौम ऋषींच्या तपश्चर्यने प्रसन्न होऊन श्री गणेश येथे प्रकट झाले. उत्तराभिमुख असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहातील श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती मनाला प्रसन्नता प्रदान करते. येथील शिलालेख मंदिराच्या प्राचीनत्वाकडे निर्देश करतो. डोंगराच्या कुशीत असलेल्या या निर्जन स्थानी मंदिराच्या एका बाजूला भूमीच्या पोटात एक गुहा दिसते. सेनापती बापट भूमिगत असताना या मंदिरात राहत असत.
अवश्य वाचा: भरोसा सेलकडून विद्यार्थिनींमध्ये जनजागृती
सोमेश्वर मंदिर (12 Jyotirlinga)
गणेशखिंडच्या पुढेच सोमेश्वर हे महादेवाचे प्राचीन मंदिर मोठ्या दरीमध्ये आहे. येथील घनदाट परिसर, फळा-फुलांनी बहरलेली झाडी, पावसाळ्यात खळाळणारा धबधबा शिवमहिमा गाताना दिसतात. पर्यटनाची आवड असणारे येथे अनघड वाटेने दगड-गोटे पार करत जंगली झुडूपांचा आधार घेत मंदिराच्या दिशेने पावले टाकत घामाने चिंब होण्याचा आनंद लुटतात.
संगमेश्वर मंदिर
पारनेरमधील मणकर्णिका नदीच्या प्रशस्त घाटालगत असलेले संगमेश्वर मंदिर गतकाळातील वैभवाच्या स्मृती जागवते. मंदिरा सभोवती असलेली दगडी भिंतीची तटबंदी अभेद्य किल्ल्यासारखीच आहे. मंदिरासमोर दोन दगडी बांधणीचे दिमाखदार यज्ञकुंड आहेत. परिसरात बेलाचे वृक्ष आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारी नंदी मंडप असून नंदीच्या आयाळीतील नारदमुनींची उभी मूर्ती लक्ष वेधून घेते. सभामंडपामधून गर्भगृहात प्रवेश करताच संगमेश्वर महादेवाच्या मनोवेधक पिंडीचे दर्शन होते. पाराशर ऋषींनी याच स्थानी यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले होते, असे सांगितले जाते.
त्र्यंबकेश्वर मंदिर
मणकर्णिका नदीच्या पैलतीरावर असलेले हे त्र्यंबकेश्वर मंदिर कळस नसलेले आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरासमोर जमिनीच्या पोटात खोलीसारख्या दगडी बांधकाम केलेल्या भागात नंदी विराजमान आहे. नंदी महादेवासमोर न राहाता तो जमिनीखाली का? हे गूढच आहे! मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारमधून आत जाताच उत्तर आणि दक्षिण दिशेस अगदी समोरासमोर दोन प्रवेशद्वार आहेत. गर्दीच्या वेळी प्रदक्षिणा घालण्याची ही व्यवस्था असावी. गर्भगृहातील शिवलिंग पहाताना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शिवलिंगाचेच दर्शन घेत आहोत, असे जाणवते. मंदिर परिसरातील स्वच्छता, शांतता, पक्षांचे बागडणे आणि हिरवीगार झाडी विसावा घेण्यातील आनंद द्विगुणीत करतात.
काशीविश्वेश्वर मंदिर
पारनेर शहरातील शाहूनगर भागात असलेले हे मंदिर मणकर्णिका नदी पात्राच्या अगदी काठावरच आहे. नदीच्या पात्रातील मणकर्णिका कुंड बारमाही पाणी असलेले आहे. मंदिरात प्रवेश करताना तब्बल पाच फूट रूंद असलेल्या भिंती पाहून मन थक्क होते. महिरपीची रचना असलेल्या प्रवेशद्वारी ऐटीत बसलेला नंदी शिवाच्या सेवेत तत्पर असावे, हा संदेश देतो आहे, असे वाटते. पिंडीवरील शाळुंका पहाताना आपण नतमस्तक केव्हा झालो ते कळतही नाही. गर्भगृहाच्या देवळीतील गणरायाचे दर्शन घेऊन या काशीविश्वेश्वराला साकडं घालण्याची प्रथा असल्याचे भाविक श्रद्धेने सांगतात.
केदारेश्वर मंदिर
बोळकोबा गल्लीत असलेले केदारेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरास कळस नाही. मंदिरासमोरच पुरातन बारव आहे. मंदिराच्या आवारात पिंपळ आणि वड हे वृक्ष एकत्र वाढलेले दिसतात. गर्भगृहातील वालुकामय शिवलिंग स्वयंभू असून जागृतस्थान म्हणून ओळखले जाते.
गढेश्वर मंदिर
पारनेरमधील महादेव गल्लीत असलेले पुरातन श्री गढेश्वर महादेव मंदिर गावात असूनही शांततेचा आनंद देते. महादेवाची उपासना कलीयुगात त्वरीत फळ देणारी असल्याचे गूढ गढेश्वर महादेव भाविकांना सांगतात, असे वाटते. मंदिराची बांधणी प्राचीन आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रकाश येण्याकरिता खास योजना केलेली दिसते. मंदिराच्या सभोवती जुने वाडे असलेली घरे आहेत.
पिंपळेश्वर तथा मल्लिकार्जुन मंदिर
मणकर्णिका नदीच्या काठावर असलेले पिंपळेश्वर तथा मल्लिकार्जुन मंदिर पश्चिमाभिमुख आहे. येथील शिलालेख मंदिराचा जीर्णोद्धार शके १२०१ मध्ये झाल्याचे सांगतो. मंदिराच्या प्रांगणात ऐसपैस जागा असून मोठे वृक्ष शिवालयातील गारवा सांभाळताना दिसतात.
महाकालेश्वर मंदिर
कुंभार गल्लीतील पूर्वाभिमुख श्री महाकालेश्वर मंदिर श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या मागेच आहे. चुनखडीचा वापर करून उभारलेल्या भिंती मंदिराच्या प्राचीनतेकडे लक्ष वेधतात. मंदिराच्या सभामंडप सारख्या भागात उजव्या सोंडेची गणपतीची शेंदूरचर्चित सुरेख मूर्ती आणि नागदेवतेची मूर्ती आहे. गणपती, नागराज आणि महादेवांचे एकत्रित दर्शन घेतल्यास संकटमुक्त झाल्याची प्रचिती येते, असे भाविक सांगताना दिसतात. महादेवाचे मंदिर असूनही येथे नंदी नाही!
पाताळेश्वर मंदिर
पारनेर शहरातील बाजारतळाजवळ पूर्वाभिमुख असलेले पुरातन श्री पाताळेश्वर मंदिर आहे. मंदिरासमोर उघड्यावरच नंदीची कोरीव मूर्ती विराजमान आहे. पिरॅमिडसारख्या गाभाऱ्यामधील या शिवलिंगाचे दर्शन घेताना ध्यानमग्न होता येते. मंदिरासमोर दगडी बांधणीतील प्रशस्त चौकोनी बारव असून या बारवेच्या भिंतीतील कोनाड्यात गणपतीची सुबक बैठी मूर्ती आहे.
नागेश्वर मंदिर
पारनेरचे ग्रामदैवत असलेले नागेश्वर गल्लीमधील श्री नागेश्वर मंदिर पुरातन असून अलीकडे उत्तमरित्या जीर्णोद्धार केलेले आहे. शिवलिंगावर चांदीचे आवरण सुरेखरीत्या बसविण्यात आलेले आहे. गाभाऱ्यात भैरवनाथांची आकर्षक मूर्ती प्रतिष्ठापित केलेली दिसते. मंदिराच्या बाजूला पायऱ्यांची बारव आहे. या बारवेमधील पाणी आटतच नाही, अशी लोकश्रद्धा आहे.
भीमाशंकर मंदिर
पारनेर शहराच्या वरच्या वेशीजवळ घडवलेल्या दगडातील मजबूत बांधणीचे पश्चिमाभिमुख श्री भीमाशंकर मंदिर आहे. गाभाऱ्यामधील शिवलिंगावर प्रकाशझोत येईल असा झरोका मंदिराची उभारणी करताना तयार करण्यात आलेला दिसतो. पिंडीवरील उभी शाळुंका भाविकांना भावते.
सिद्धेश्वर मंदिर
पारनेरपासून तीन किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर दरा येथे दरीत असलेले हे पश्चिमाभिमुख श्री सिद्धेश्वर मंदिर भाविकांना निसर्गाशी समरस होण्यातील आनंद देते. पाराशर ऋषींनी देवाधिदेव महादेवांकडून येथेच सिद्धी प्राप्त करून घेतल्या, असे भाविक श्रद्धेने सांगताना दिसतात. नंदीमंडपात नंदीची दिमाखदार मूर्ती विराजमान असून नंदीच्या आयाळीत नारदमुनी दिसतात. सभामंडप प्रशस्त आणि कलाकारांनी अविश्रांत मेहनत घेत नाजूक कलाकुसर केलेला आहे. गर्भगृहामधील सिद्धेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेताना भान हरपते. पावसाळ्यात मंदिरासभोवती कोसळणाऱ्या जलधारा सिद्धेश्वरास जलाभिषेक घालण्यासाठीच धावत येतात, असे वाटते. पाऊस नसल्यावर पाण्याच्या ओहोळाच्या खुणा येथील भव्यता डोळ्यासमोर उभी करतात. मंदिरामागे पाण्याचे मोठे कुंड आहे. पाराशर ऋषींना भगवान शिवाचे दर्शन झाल्यावर याच कुंडामधून गंगा प्रकट झाली, असे सांगितले जाते.
पारनेरमधील बारा ज्योतिर्लिंग दर्शनाची एक दिवसीय यात्रा श्रावण महिन्यात आपल्या सोयीने सहकुटुंब करून शिव दर्शनासह निसर्गात राहाण्याचा आनंद लुटावा.
- मिलिंद सदाशिव चवंडके
( लेखक – नगर जिल्हा इतिहास संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष)