नगर : दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी केले. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या (Jansanman Yatra) माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत.
नक्की वाचा : ‘राज्यातील सध्याचे सरकार हे बैलपुत्र,त्यांची बुद्धीही बैलाचीच’-संजय राऊत
बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार (Ajit Pawar)
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे तीन हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आत्तापर्यंत तब्बल २ कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झालाय. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश आहेत. तसेच, महिन्याला १५०० रुपये जमा होण्याची वाट पाहतात. राज्य सरकारने ऐन रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्यांचा एकत्रित हफ्ता ३००० रुपये जमा केला होता. त्यानंतर,सप्टेंबर महिन्यातील १५०० रुपयांचा हफ्ता देखील २९ सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. आता,पुन्हा एकदा बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं अजित पवारांनी सांगितले आहे.
अवश्य वाचा : मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!
यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्या त्या ठिकाणी मी जनसन्मान यात्रा घेऊन जात आहे. विरोधक टीका करतात, पण आमच्या अंगाला काही भोक पडत नाहीत. ते सत्तेत असताना कोणती योजना आणली ? मात्र, माता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही केव्हाही काढू शकता. आम्ही दिलेल्या योजना पाच वर्षे चालण्यासाठी घड्याळ चिन्हाला तुम्हाला मतदान करावे लागेल. मी बोलतो तसा वागतो, हा अजितदादांचा वादा आहे. रक्षाबंधनला जसे तीन हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेला देखील माझ्या बहिणीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार हाच माझा वादा आहे, अशी घोषणाच माजलगाव येथील सभेतून अजित पवारांनी केली.
पंकजा मुंडे यांच्या पराभवाची सल अजुनही मनात (Ajit Pawar)
राज्यात आमच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील,त्यापैकी दहा टक्के जागा अल्पसंख्यांक समाजाला देणार आहे. लोकसभेला आम्ही कमी पडलो, बीडची जागा सहा सात हजाराने गेली, आम्हाला वाईट वाटले, असे म्हणत पंकजा मुंडे यांच्या पराभवाची सल अजित पवारांनी बोलून दाखवली.तसेच, माजलगावमध्ये तुमच्या मनात जो उमेदवार आहे, त्या उमेदवाराला मी उमेदवारी देईल हा शब्द देतो, असेही अजित पवार म्हणाले.