नगर : प्रयागराजमध्ये (Prayagraj) देशभरातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात बुधवारी (ता.२६) महाशिवरात्रीला त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानाचा लाभ घेतला. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार,महाकुंभमध्ये (Mahakumbh) मंगळवारी (ता.२५) मध्यरात्रीपासून सकाळी १० वाजेपर्यंत ८१ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी स्नान केले. १३ जानेवारीपासून सुरू झालेला आणि मागील ४५ दिवस सुरू असलेला हा धार्मिक सोहळा महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) मुहूर्तावर समाप्त झाला.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हफ्ता मिळण्यास सुरवात
प्रयागराज कुंभमध्ये ६५ कोटींहून अधिक भाविकांचे स्नान (Mahakumbh 2025)

पौष पौर्णिमाला सुरवात झालेल्या या महाकुंभ उत्सवात नागा साधूंची भव्य मिरवणूक आणि तीन अमृत स्नान झाले. सरकारने दिलेल्या आकेडवारीनुसार,यावर्षी प्रयागराज कुंभमध्ये ६५ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कुंभमेळ्यात अखेरच्या दिवशीही देशभरातील लाखो भाविकांनी हजेरी लावली. महाशिवरात्रीला प्रयागराजमध्ये खास उभारण्यात आलेल्या महाकुंभ नगरमध्ये चहूबाजूंनी ‘हर हर महादेव’,‘जय महाकाल’चा गजर होत होता. महाशिवरात्री हा उत्सव शिव-पार्वती यांच्या दैवी मिलनाचे प्रतीक असून कुंभमेळ्याच्या संदर्भात तिचे विशेष महत्त्व आहे.
अवश्य वाचा : पुणे हादरलं!स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार
संगम, घाट परिसर आणि पाचही शिवालय परिसरात गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याची माहिती पोलीस महासंचालक वैभव कृष्णा यांनी दिली. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे ४ वाजता गोरखपूर येथून वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसमवेत कुंभमेळ्यातील व्यवस्थेवर देखरेख ठेवायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी ‘एक्स’वरून साधूसंत आणि भाविकांना पवित्र स्नानासाठी शुभेच्छा दिल्या.
भाविकांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी (Mahakumbh 2025)
महाकुंभाच्या पवित्र काळात हेलिकॉप्टरने भाविकांवर पाचवेळा वीस क्विंटल फुलांचा वर्षाव करण्यात आला. कुंभातील शेवटचे पवित्र स्नान असल्याने मध्यरात्रीपासूनच संगम किनारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. काही भाविक ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्यासाठी थांबले होते, तर अनेक भाविकांनी नियोजित वेळेपूर्वीच स्नान केले.