Nagar Urban Bank | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील नावाजलेल्या नगर अर्बन बँकेत (Nagar Urban Bank) २९१ कोटीचा घोटाळा प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या गुन्ह्यात संचालक, कर्जदार आरोपी असून, आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, अद्याप फारसे काही हाती लागले नसल्याने आता याप्रकरणी थेट ‘ईडी’कडून (ED) चौकशी सुरू करण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
नक्की वाचा : पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड
राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल (Nagar Urban Bank)
शहरासह जिल्ह्यात शाखा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या शाखांतील गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांवर १५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नगर अर्बन बँकेत २०१४ ते २०१९ या कालावधीतील अध्यक्ष, संचालक मंडळातील सदस्य व बँकेचे अधिकारी जबाबदार पदावर कार्यरत असताना मुख्य शाखेत कर्ज प्रकरणांबाबतचे निर्णय घेत बनावट कागदपत्रांचा वापर करून नगर अर्बन बँकेची १०० ते १५० कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
अवश्य वाचा : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा
फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये अपहार उघड (Nagar Urban Bank)
हा गुन्हा मोठ्या रक्कमेचा असल्याने गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तपासात बँकेतील गैरव्यवहारांबाबत फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये २९१.२५ कोटीचा अपहार झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत तत्कालीन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कर्जदार असे १७ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून, आरोपींची संख्याही वाढत आहेत.
दरम्यान, आता थेट इडीकडून बँकेची सर्व माहिती मागविण्यात आली असून घोटळ्याचीही चौकशी सुरू आहे. या संबंधी बँकेच्या अधिकाऱ्याला नोटीस पाठवून बोलावून घेण्यात आले होते. बँक अधिकाऱ्यांनी ८ जुलै रोजी ईडी कार्यालयात हजर राहुन बँकेची वस्तुस्थिती सादर केली आहे. आतापर्यंत बँक किती कर्जदारांनी पैसे भरले. किती कर्जदार पैसे भरण्यास नकार देत आहेत. याबाबत ईडीकडून माहिती घेण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्जदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.