Nilesh Lanke : नगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena (UBT)) गटाचे शहरप्रमुख किरण गुलाबराव काळे (Kiran Kale) यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा सखोल आणि नि:पक्षपाती तपास व्हावा, अशी मागणी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे सविस्तर निवेदनाद्वारे केली आहे.
नक्की वाचा : पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा; ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचा आरोप
खासदार लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह अप्पर पोलिस अधीक्षकांची शनिवारी भेट घेऊन काळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठामपणे सांगितले. दरम्यान निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, किरण काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, नुकतेच त्यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील तब्बल ३५० ते ४०० कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश प्रसारमाध्यमांसमोर केला होता. या आरोपानंतर काही दिवसांतच, दिनांक २१ जुलै २०२५ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७६(१), ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
अवश्य वाचा : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती
खासदार लंके यांच्या मते, (Nilesh Lanke)
ही घटना ही राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हा दाखल होऊनही अद्यापपर्यंत कोणताही सखोल तपास झालेला नाही, हे विशेष चिंतेचे असून, पोलिस यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याचे संकेत मिळत आहेत, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
“पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करताना व तपासाच्या प्रक्रियेत तटस्थता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. गुन्ह्याचा योग्य तपास होऊन सत्य बाहेर येणे हाच न्यायप्रक्रियेचा गाभा आहे,” असे स्पष्ट करत लंके यांनी हा गुन्हा जिल्हा पातळीबाहेरील स्वतंत्र पोलीस यंत्रणेकडे सोपवण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली.
ते पुढे म्हणाले की, “कोणावरही अन्याय होऊ नये, आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हा लोकशाहीतील मूलभूत सिद्धांत आहे. न्यायाच्या दृष्टीने पारदर्शक आणि निष्पक्ष तपास ही काळाची गरज आहे.”
पोलीस दलाचा गैरवापर
अप्पर पोलीस अधीक्षक वैभव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार लंके यांनी सांगितले की, किरण काळे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा तांत्रिक स्वरूपाचा आहे. त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने तो दाखल झाला आहे. या गुन्ह्याची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. हा गुन्हा कोणाच्यातरी सांगण्यावरून दाखल करण्यात आला असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीवरही गुन्हा दाखल करा अशी मागणी आम्ही केल्याचे खासदार लंके म्हणाले.
ते पुढे म्हणाले, अहिल्यानगर शहरात आतापर्यंत अनेक वेळा अशा प्रकारची तांत्रिक गुन्हे दाखल झालेले आहेत. यापूर्वी माजी आमदार स्व.अनिलभैय्या राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक विक्रम राठोड व योगीराज गाडे यांच्यावर तांत्रिक गुन्हे दाखल करून पोलीस दलाचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप खासदार लंके यांनी केला.