नगर : मागील काही दिवसांपासून आपल्या सगळ्यांच्याच कानावर एक शब्द हा सातत्याने पडत आहे. तो म्हणजे ‘रेव्ह पार्टी’ (Rave Party). हा शब्द चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पुण्यात रविवारी (ता. २७) एका हायप्रोफाइल रेव्ह पार्टी दरम्यान टाकलेल्या छाप्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. या पार्टीत कोकेन, हुक्का आणि दारूचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या चर्चेत असलेला रेव्ह पार्टी हा शब्द व प्रकार नेमका आहे हे जाणून घेऊयात…
नक्की वाचा : मोठी बातमी! मुंबई, नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात १२ ठिकाणी ईडीची छापेमारी
रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय ? (Rave Party)
रेव्ह पार्टी म्हणजे असा एक सोशल इव्हेंट, ज्यामध्ये काही लोकं ठरलेल्या जागी भेटतात, खातात- पीतात आणि डान्स करतात. ज्या पार्ट्यांमध्ये कोणत्याच मर्यादा नसताात अशा पार्ट्यांना रेव्ह पार्टी असं म्हणतात. ही पार्टी बऱ्याचवेळा जंगल, डोंगरकडा, फार्महाऊस किंवा किनारपट्टीवर आयोजित केली जाते. या ठिकाणी जेवण, मद्य, आकर्षक लाईट्स आणि हाय व्होल्युम म्युझिक यांची सोय केली जाते. अनेक वेळा या पार्ट्यांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांकडून प्रवेश शुल्कही घेतलं जातं. त्या बदल्यात तिथे येणाऱ्या लोकांना मद्य किंवा इतर गोष्टी पुरवल्या जातात.
पुण्यात रेव्ह पार्टी हा शब्द २००७ साली अधिक चर्चेत आला. सिंहगड परिसरातील डोणजे गावात पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची आजही चर्चा होते. डोणजे गावात रेव्ह पार्टीमध्ये अंमली पदार्थांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ही पार्टी थांबवली होती. धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत तब्बल २०० ते २५० तरुण मुल मुली ही पार्टी करताना पोलिसांनी सापडले होते.
कशी असते रेव्ह पार्टी ? (Rave Party)
रेव्ह पार्टीमध्ये डान्स आणि मस्ती रंगलेली असते. मात्र मस्तीच्या नावाखाली अश्लील प्रकार देखील या पार्टीत मोठ्या प्रमाणात सुरु असतात. ड्रग्सचा वापर देखील रेव्ह पार्टीमध्ये होत असतो. ज्यामुळे रेव्ह पार्टीवर पोलीस धाड टाकतात आणि कारवाई करतात. जेव्हा पोलीस अशा पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा त्यांना मद्यपी किंवा मद्यधुंद अवस्थेत असलेले लोक आढळतात, तेव्हा पोलीस त्यांना ताब्यात घेतात आणि पुढील कारवाई करतात. या पार्टीत अनेकदा तरुण मुले – मुली नश्या केलेल्या अवस्थेत आढळून येतात.
भारतात रेव्ह पार्ट्या बेकायदेशीर आहेत का? (Rave Party)
भारतात रेव्ह पार्टीसाठी कोणता विशेष कायदा नाही. मात्र जर कोणत्या पार्टीमध्ये नियमांचं उल्लंघन होत असेल तर, कारवाई केली जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या पार्टीत डीजेचा दणदणाट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे, जर रेव्ह पार्टी नावाच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज आढळले किंवा कोणी मद्यधुंद आढळले तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. एनडीपीएस कायद्यानुसार,जर एखाद्याजवळ वैयक्तिक वापरासाठी अमली पदार्थ सापडले, तर त्याला ६ महिने ते १ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. पण जर हे ड्रग्ज मोठ्या प्रमाणात साठवून विक्रीच्या उद्देशाने ठेवलेले आढळले, तर आरोपीला १० वर्षांपर्यंत शिक्षा आणि आर्थिक दंड देखील होऊ शकतो. रेव्ह पार्टी हा प्रकार केवळ एक मजा किंवा स्टेटस सिम्बॉल नसून, यामध्ये कायदाचं उल्लंघन झालं तर त्याचे गंभीर परिणाम सुद्धा भोगावे लागतात.