Abuses on Minor Girls : पाथर्डी: तालुक्यातील जिल्हा परिषद (ZP School) शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या परप्रांतीय सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार (Abuses on Minor Girls) केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची तक्रार दडपण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी (Police) चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी शिक्षक अद्याप पसार आहे.
अवश्य वाचा : आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
आरडाओरडा करू लागल्यावर आरोपीने केली मारहाण
प्राप्त माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील एका शाळेत शिक्षण घेणारी सात वर्षांची मुलगी गेल्या महिनाभरापासून शाळेच्या सुट्टीत एकटी असल्याचा फायदा घेत एका शिक्षकाने तिच्याशी वेळोवेळी अश्लील वर्तन करत गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी आरडाओरडा करू लागल्यावर आरोपीने तिला मारहाणही केल्याचे समोर आले आहे.
नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न
चौघांनीच तक्रार न करण्याचा आणला दबाव (Abuses on Minor Girls)
ही घटना पीडितेच्या पालकांनी गावातील काही जणांना सांगितल्यानंतर या चौघांनीच तक्रार न करण्याचा दबाव आणला. तक्रार केली, तर गावात राहू देणार नाही अशी धमकी देत पीडितेच्या कुटुंबाला गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रकरण बाहेर आल्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात वरील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव तसेच संदीप ठाकणे, नितीन दराडे, बाबासाहेब बडे, इजाज सय्यद, अक्षय वडते आणि अमोल जवरे यांच्या पथकाने केली.
या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड व अॅड. हरिहर गर्जे यांनी पुढाकार घेतला. त्यांना सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी तसेच उडान संस्थेच्या पूजा दहातोंडे व शाहीन शेख यांची मोलाची साथ लाभली. पीडित कुटुंबाला मानसिक आधार देतानाच तक्रार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देत गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून, वैद्यकीय अहवाल प्राप्त होणे महत्त्वाचे ठरणार आहे.