Rain : कर्जत : पुणे (Pune) जिल्ह्यात तसेच धरण क्षेत्रात पाऊस (Rain) थांबल्याने भीमा नदीतील (Bhima River) पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने पुलावरील पाणी ओसरताच शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता सिद्धटेकचा (Siddhatek) पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिली. पुलावरील घाण, कचरा आणि चिखल स्थानिक प्रशासनाने तत्काळ दूर करीत पुलाची स्वच्छता सुरू केली आहे.
नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा
पावसाने उसंत घेतल्याने विसर्ग टप्याटप्याने कमी
बुधवारी रात्री सिद्धटेक (ता.कर्जत) येथील भीमानदीचा पूल १ लाख २४ हजार क्यूसेक वेगाच्या विसर्गाने पुराच्या पाण्याखाली गेला होता. तालुका प्रशासनाने विशेष खबरदारीचा उपाय म्हणून सदरचा पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद केल्याने सिद्धटेक-दौंडचा संपर्क तुटला होता. गुरुवारी दिवसभर पुलावर पाणी कायम असल्याने अडथळा टाकत दोन्ही बाजूची वाहतूक बंदच होती. पुणेसह धरण क्षेत्रात गुरुवारी मान्सून पावसाने उसंत घेतल्याने धरणातून दौंड येथील भीमानदीतील पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने कमी करण्यात आला.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर
पाणी ओसरल्याने पूल वाहतुकीसाठी खुला (Rain)
शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता ७७ हजार ४५५ क्यूसेक विसर्गाने सिद्धटेक पुलावरील पाणी ओसरल्याने पूल वाहतुकीसाठी योग्य असल्याची शहानिशा करताच तो सर्वसामान्य वाहनचालकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुराच्या पाण्याने पुलावर प्लास्टिक कचरा, झाडे-झुडपे तसेच चिखल झाला होता. तेथील स्थानिक ग्रामप्रशासनाने तात्काळ पुलाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. यामुळे सिद्धटेक-दौंड वाहतूक शुक्रवार सकाळपासून सुरळीत झाली आहे. भीमानदी सद्यस्थितीत देखील धोक्याच्या पातळीवर वाहत असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहत प्रशासकीय सुचनेचे पालन करण्याचे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.