Sports Complex : पारनेर: तालुक्यातील क्रीडा संकुल (Sports Complex) गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असल्याने नागरिक आणि खेळाडूंमध्ये (Players) नाराजी होती. एकेकाळी आदर्श ठरलेले हे संकुल आज गवत-झुडपांनी व्यापले असून महिलांच्या व्यायामशाळेतील (Gymnasium) साहित्य गायब झाले आहे. टॉयलेट्स व इमारती जीर्णावस्थेत आहेत, तर कबड्डी आणि खो-खो मैदानांकडेही दुर्लक्ष झाले आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांतील गण रचनेत मोठा फेरबदल; अंतिम गट-गण रचना जाहीर
तीन कोटी रुपयांचा विकास आराखडा जाहीर
या गंभीर परिस्थितीची दखल घेत तालुका क्रीडा समितीच्या बैठकीत आमदार तथा समितीचे अध्यक्ष काशिनाथ दाते यांनी पुढाकार घेत तीन कोटी रुपयांचा विकास आराखडा जाहीर केला आहे. संकुलाची दुरावस्था लक्षात घेऊन वृक्षप्रेमी क्रीडा संकुल मित्र मंडळाने आमदार दाते यांना भेट देऊन माहिती दिली होती. यानंतर आमदार दाते यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश खोडदे, माजी सैनिक सहदेव घनवट, सतीश म्हस्के, क्रिकेट पंच विलास तराळ आदींसह संकुलाची पाहणी केली.
अवश्य वाचा : “मनोज जरांगे यांनी कागद अन् पेन घेऊन सरकार समोर आरक्षणाबाबत चर्चेला बसावं”- चंद्रकांत पाटील
पारनेर संकुलाची दुरावस्था ही मन विषण्ण करणारी (Sports Complex)
पाहणीवेळी महिला व्यायामशाळा, टेनिस कोर्ट आणि स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था उघड झाली. अनावश्यक प्रकारांना आळा बसावा, यासाठी तातडीने सुरक्षा रक्षक नेमण्याची सूचना यावेळी देण्यात आली. तसेच देखभालीसाठी वृक्षप्रेमी क्रीडा संकुल मित्र मंडळ लक्ष देईल, असेही निश्चित करण्यात आले. पाहणी पूर्ण झाल्यानंतर पारनेर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या तालुका क्रीडा समितीच्या बैठकीत संकुलाच्या सुधारणा आणि आधुनिकीकरणा- बाबत सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारकडून क्रीडा क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असतानाही पारनेर संकुलाची दुरावस्था ही मन विषण्ण करणारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावर आमदार दाते यांनी पारनेरकरांसाठी सुसज्ज आणि आधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी तीन कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला असल्याचे स्पष्ट केले.
या आराखड्यात महिलांच्या जिमचे नुतनीकरण, व्यायाम साहित्याची खरेदी, जिम व टॉयलेट्सची दुरुस्ती, २०० मीटर जॉगिंग ट्रॅकची उभारणी, कबड्डी व खो-खो मैदानांचे आधुनिकीकरण आणि संकुल परिसरातील गवत-झुडपांची तातडीने सफाई या कामांचा समावेश आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. ई. वसईकर, अभियंता पंकज लेंडे व राहुल सुरवसे यांना तातडीने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यावेळी आमदार दाते यांनी दिले. या निर्णयामुळे पारनेरमधील खेळाडू व नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खेळाडूंच्या मते, संकुलातील सुविधा सुधारल्यास स्थानिक पातळीवरूनच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील.