Mumbai Traffic: : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. त्यासाठी लाखो मराठा (Maratha) बांधव दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येतंय. अनेक रस्त्यांवर वाहने दिसत असून ईस्टर्न फ्री वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. तर मध्य रेल्वेची वाहतूकही काही प्रमाणात संथ झाल्याचं दिसून येत आहे.
सीएसटीएम आणि चर्चगेटवर गर्दी (Mumbai Traffic)
एकीकडे गणपतीचा उत्साह असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं आहे. त्यासाठी राज्यभरातून लाखो बांधव मुंबईत पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक कोंडी झाल्याने आंदोलकांनी लोकल ट्रेनचा पर्याय घेतल्याचे दिसून येतंय. त्यामुळे सीएसटीएम आणि चर्चगेट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. CSMT वरुन कल्याण आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रेल्वे तुडुंब भरलेल्या दिसत आहेत. तसेच मध्य रेल्वेची वाहतूक १० मिनिटे उशीरा होत आहे.
ईस्टर्न फ्री वेवर वाहतूक कोंडी(Mumbai Traffic)
मराठा आंदोलकांच्या शेकडो गाड्या ईस्टर्न फ्री वेवर असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलीस ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मानखुर्द येथे मोठ्या प्रमाणात सायन -पनवेल हायवेला वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस आणि आंदोलकांमुळे ट्रॅफिक जॅम झाल्याचे दिसून येत आहे. जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईतील रस्ते ब्लॉक झाल्याचं चित्र आहे. गुगल मॅप वरील अनेक रस्ते लाल रंगात दिसत आहेत. मराठवाडा, नाशिकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक आझाद मैदानात आल्याने त्याचा फटका दक्षिण मुंबईच्या वाहतुकीला बसल्याचं दिसून येत आहे.
वाहतुकीत बदल (Mumbai Traffic)
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाशीहून येणाऱ्या साऊथ बाऊंड पांजरपोळ फ्रीवेकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे. तसंच वीर जिजाबाई भोसले मार्गाकडून ट्रॉम्बेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे. यासोबतच छेडानगर वरून फ्रीवेला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे. यासाठी पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. बाहेरून आलेल्या गाड्यांना वाशी रेल्वे स्थानकाबाहेर पार्क करून ट्रेन ने मुंबईत जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.