ST Bus : कर्जत : गुरुवार, दुपारी १:४५ वाजताची वेळ. ठिकाण कर्जत बसस्थानक (Karjat Bus Stand). रंगरंगोटी केलेली नवीन कोरी एसटी बस (ST Bus) कर्जत बसस्थानकात प्रवेश करताच अनेक बघ्यांनी मोठी गर्दी केली. अखेर अनेक दिवसांपासूनचे कर्जतकरांचे स्वप्न असणारे कर्जत आगार नाव असलेली बस पाहताच अनेकांना स्वप्नपूर्तीचा आनंद झाला. बसच्या प्रथमदर्शनी आणि मागे पण – अहिल्यानगर आणि चौकटीत कर्जत नाव सुखावह वाटले. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) उदघाटन झालेले कर्जत बस आगार कार्यान्वित करून सुरू करावे, या मागणीसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. कर्जत आगाराची बस दिसताच त्या आंदोलनास यश मिळाल्याची भावना सर्वसामान्य प्रवाशांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
नक्की वाचा: आईने कचरा टाकायला सांगितल्याने मुलगा गेला घर सोडून
राजकीय श्रेयवादातून डेपो सुरू केला नसल्याचा आरोप
कर्जतकरांच्या जिव्हाळ्याचा एसटी डेपोचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी मंजुरी घेत प्रत्यक्ष त्याचे काम पूर्ण करून मार्गी लावला होता. तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन देखील झाले. मात्र, केवळ राजकीय श्रेयवादात अजूनही हा डेपो सुरू केला नसल्याचा आरोप करीत २५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि मित्र पक्षांच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या प्रसंगी अहिल्यानगर विभागीय नियंत्रकांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करीत १० सप्टेंबरला १० बस देणार असल्याचे लेखी पत्र दिले होते. तसेच २० सप्टेंबरपर्यंत कर्जत एसटी डेपो सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
अवश्य वाचा: १२७ कोटीची कामे अहिल्यानगर महापालिका करतेय उध्वस्त’
आणखी ८ बस मिळणार (ST Bus)
गुरुवार, दि ११ सप्टेंबर रोजी दुपारी १:४५ वाजता कर्जत बसस्थानक परिसरात नव्याने रंगरंगोटी केलेली एक नवी कोरी बस त्यावर अहिल्यानगर आणि चौकटीत कर्जत आगार नाव असलेली बस स्थानकात उभी असल्याचे पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. सर्वच जण त्या बसकडे कुतूहलाने काय पाहत आहे? याचा प्रश्न पडला असताना कर्जत बस आगार नाव असलेली बस मिळाली असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांचा देखील आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी बसस्थानकात उपस्थित असणाऱ्याना कर्जत आगार नाव असलेल्या एसटी बसचा फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. याबाबत कर्जतचे वाहतूक नियंत्रक हनुमंत लटपटे यांच्याकडे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी जामखेड डेपोने कर्जतसाठी ३ बस उपलब्ध केल्या असून त्या तिन्ही बसेसवर कर्जत आगार नाव टाकण्यात आले असल्याची माहिती दिली. यासह श्रीगोंदा आगारातून देखील आणखी ८ बस मिळणार आहे त्यावर देखील कर्जत आगार नाव असणार असल्याचे सांगितले.