Heavy Rain : कर्जत: शनिवार पाठोपाठ रविवारी देखील कर्जत तालुक्यात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. राशीन भागात दुसऱ्या दिवशी देखील ढगफुटी सदृश पावसाने (Heavy Rain) नोंद केली. या भागातील वाड्या-वस्तीवरील जनजीवन विस्कळीत झाले असून राशीन मंडळात दोन दिवसांत तब्बल २५२ मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) आणि आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तालुका प्रशासनास दिले.
नक्की वाचा : मोहटादेवी गडावर नवरात्रात पोलीस बंदोबस्तात वाढ; सोमनाथ घार्गे यांचे आश्वासन
नेक नदी-नाले, बंधारे, तलाव वाहिले
शनिवारी संध्याकाळपासून कर्जत शहर आणि मंडळ क्षेत्रात सर्वच ठिकाणी मान्सून पावसाने जोरदार पुनरागमन करत थैमान घातले. कर्जतला ७९ मिमी तर राशीन १४२ मिमी पावसाने नोंद लावत तब्बल सहा-सात तास पावसाने हजेरी दिली होती. या पावसाने अनेक नदी-नाले, बंधारे, तलाव खळखळून वाहिले. तर शेतास तलावाचे स्वरूप प्राप्त होत पीके पाण्याखाली गेली. रविवारी संध्याकाळी देखील तालुक्यात चांगलाच पाऊस बरसला. अळसुंदे, राशीनमध्ये पुन्हा धो-धो पाऊस पडल्याने परिसरातील अनेक वाड्या-वस्त्याना याचा मोठा फटका बसला. रविवारी देखील कर्जत तालुक्यातील सर्वाधिक पाऊस राशीनला पडला. तब्बल ११० मिमी पावसाची नोंद शासन दफ्तरी लागली. त्या पाठोपाठ मिरजगाव, कोंभळी मंडळात अधिक पाऊस पडल्याने आठ वर्षानंतर कोंभळीचा तलाव ओव्हर फ्लो होत रस्त्यावर पाणी वाहिल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेतील प्रभाग सहामध्ये इच्छुक उमेदवार लागले तयारीला
शेती गेली पाण्याखाली (Heavy Rain)
रविवारी सर्वात कमी माही मंडळात पाऊस झाला. अवघा १४ मिमी पाऊसच माही मंडळात पडला. दोन दिवसांच्या तुफान पावसाने अनेक शेतास तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने मका, बाजरी, कापूस, तूर, भाजीपाला शेती पाण्याखाली गेली आहे. तर काही भागात ऊस पिकास चांगलाच फटका बसत जमीनदोस्त झाली आहे. होलेवाडी व चिलवाडी येथील पाझर तलाव फुटल्याने सदरील भागात नुकसानीची तीव्रता अधिक आहे. यासह काही भागात घरात पाणी घुसने, पडझड, वाड्या- वस्त्यांना जोडणारे लहान पूल वाहून गेली असल्याची माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत त्याचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी तालुका प्रशासनास दिल्या आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बाधित गावांच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित तेच्यादृष्टीने शाळा बंद ठेवण्याचा अधिकार स्थानिक शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान केला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी जाहीर केले आहे. याबाबत प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी कर्जत आणि तालुका प्रशासनास तसे अवगत केले आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक तालुका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन संबंधीच्या सर्व सूचना वेळोवेळी पालन करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.