Chief Minister’s Samruddhi Panchayat Raj Campaign : नगर : राज्य शासनाच्या (State Government) ग्रामविकास विभागाने राज्यात बुधवारपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास (Chief Minister’s Samruddhi Panchayat Raj Campaign) सुरूवात केली. त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व १ हजार ३२४ गावात पहिल्याच दिवशी ग्रामसभा घेऊन अभियानाची माहिती देण्यात आली. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत या अभियानातून प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ अखेरच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा काम करणार आहे. यात प्रत्येक गावाचे मूल्यमापन करून तालुका, जिल्हा, महसूल विभाग (Revenue Department) आणि राज्यस्तर अशा चार टप्प्यांत गावाना बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अवश्य वाचा : शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव
योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने या अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रितीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींना मिळणार अशी बक्षिसे अभियान काळात ग्रामपंचायतींनी केलेल्या कामांचे मूल्यमापन तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय समितीकडून ११ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत केले जाईल. यात ७ घटकांची तपासणी करून त्याला १०० पैकी गुण दिले जाणार आहेत. त्यातून उत्कृष्ट ग्रामपंचायतीला तालुकास्तरावर प्रथम १५ लाख, द्वितीय १२ लाख, तृतीय ८ लाख, जिल्हास्तरावर प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख, तृतीय २० लाख, विभागीय स्तरावर प्रथम १ कोटी, द्वितीय ८० लाख, तृतीय ६० लाख, तर राज्यस्तरावर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तर तृतीय २ कोटींचे बक्षीस दिले जाईल.
नक्की वाचा : सोन्याच्या दुकानात चोरी करणारे चौघे ताब्यात; कोतवाली पोलिसांची कामगिरी
या ७ घटकांवर होणार गावाचे मूल्यमापन (Chief Minister’s Samruddhi Panchayat Raj Campaign)
१) सुशासनयुक्त पंचायत (आपले सरकारमधून ५९२ सेवा ॲानलाईन देणे, ग्रामस्थांच्या सर्व तक्रारी दूर करणे, गावात सीसीटीव्ही बसवणे, पात्र लोकांचे आयुष्यमान कार्ड तयार करणे)
२) सक्षम पंचायत (गावाची घरपट्टी व पाणीपट्टी ८० टक्केपेक्षा जास्त वसूल करणे, हजार लोकसंख्येमागे २ लाख लोकवर्गणी करून लोकोपयोगो कामे करणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाय करणे)
३) जलसमृद्ध व स्वच्छ-हरित गाव (गावातील सर्व घरांना नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे, सौरउर्जेचा वापर करून वीजदेयके शून्यावर आणणे, वृक्ष लागवड व संवर्धन, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन)
४) मनरेगा व इतर योजनांची एकात्मता (रोजगार योजनेची प्रभावी अंमलबजावणी, बायोगॅस, शेळीपालन शेड, कांदा चाळ आदी कामे हाती घेणे)
५) गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण (शाळा व अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणे, जास्तीत जास्त सौरउर्जेचा वापर, स्मशानभूमी विकसित करणे)
६) उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय (मंजूर घरकुलांचे काम पूर्ण करणे, बचतगटांचा सक्रिय सहभाग घेणे, महिलांना लखपती दिदी करणे)
७) लोकसहभाग आणि श्रमदानातून लोकचळवळ (आठवड्यातून किमान एक दिवस श्रमदान करणे, गावातील रस्ते दुरूस्त करून दळणवळणास चालना देणे)