Devendra Fadnavis : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याविरोधात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. आता त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा : “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ? (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, “गोपीचंद पडळकर यांचे विधान योग्य आहे, असे माझे मत नाही. कुणाच्याही वडील आणि कुटुंबाबाबत चुकीचे भाष्य करणे योग्य नाही. यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलून त्यांना समज दिली आहे. शरद पवारांचाही यासंदर्भात मला फोन आला होता. या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही, हे मी त्यांना सांगितले.
देवेंद्र फडणवीसांचा पडळकरांना सल्ला (Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “गोपीचंद पडळकर हे तरूण आणि आक्रमक नेते आहेत. अनेकदा आक्रमकता दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल, हे ते लक्षात घेत नाहीत. हे लक्षात ठेवून आक्रमकता दाखवली पाहिजे, असे त्यांना मी सांगितले. तुम्हाला भविष्यात चांगला नेता होण्याची मोठी संधी आहे. त्याच्यामुळे बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील, हे लक्षात ठेवा”,असा सल्ला आमदार पडळकर यांना दिला असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अवश्य वाचा : अहिल्यानगर मध्ये ठराविक जागीच गोमांस का आढळून येतयं?
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचे वडील, दिवंगत नेते राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख करत अश्लाघ्य विधान केले होते. या विधानानंतर सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. तसेच शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अजित पवारांनीही राजकीय संस्कृती जपायला हवी, असा टोला लगावला आहे.