Theft : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक (Shingave Naik) परिसरातील तीन मंदिरात चोरी करणारे संशयित तीन आरोपी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) ताब्यात घेतले आहे. श्रीराम मंदिर, भैरवनाथ मंदिर आणि सावता महाराज मंदिरात झालेल्या चोरीचा उलगडा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत केला आहे. त्यांच्याकडून एक लाख तीन हजार रुपय किमतीचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत करून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्या हस्ते मंदिर व्यवस्थापनाला परत देण्यात आला.
शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
१ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल केला होता लंपास
किशोर तुकाराम बर्डे (रा. वरंवडी, ता. राहुरी), सागर गणपत बर्डे आणि संजय बबन बर्डे (दोघे, रा. मुळानगर, मुळा डॅम, ता. राहुरी), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी किशोर बर्डे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दरोडा, चोरी व फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विवेक लक्ष्मण शिंदे (रा. शिंगवे नाईक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार (ता. १५) रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन मंदिरांचे कुलूप तोडून सोन्याचे व चांदीचे दागिने, पंचधातूचे मुकुट, तसेच ५० हजार रोख अशा एकूण १ लाख ३३ हजार किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता.
अवश्य वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार
मुळा डॅम परिसरात सापळा रचून आरोपी ताब्यात (Theft)
याशिवाय सावता महाराज मंदिरात तोडफोड व भैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडून १ हजार ५०० चोरी गेले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तपासाची चक्रे फिरवत त्यांना मिळलेल्या माहितीनुसार हा गुन्हा किशोर बर्डे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मुळा डॅम परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. मुद्देमाल पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते श्रीराम मंदिर व्यवस्थापनाला परत करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी ढोलताशांच्या गजरात व फटाके वाजवून पोलिसांचे स्वागत केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोसई मनोज मोंढे, अंमलदार राकेश खेडकर, संदीप पवार, राजु सुद्रीक, सचिन आडबल, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव, जयशिंग शिंदे, सुरज देशमुख, सचिन हरदास व राहुल गुंड्डू यांचे पथकाने केली आहे.



