Mohtadevi : पाथर्डी: मोहटादेवी (Mohtadevi) माता की जय, असा गजर करत सोमवारी सकाळी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवीगडावर (Mohta Devi Gad) पारंपरिक पद्धतीने घटस्थापना (Ghatasthapana) करण्यात आली. वरून राजाच्या साक्षीने अत्यंत धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला. तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मोहटादेवी गडाकडे जाणाऱ्या मार्गावर कारेगाव येथील पूल तुटल्याने भाविकांनी येऊ नये, असे आवाहन देवस्थान समितीने केले होते. तरीही वेगळ्या मार्गाने जाऊन अनेक भाविकांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीच्या चरणी हजेरी लावली.
अवश्य वाचा: नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
देवीच्या सुवर्ण मुखवट्याची वाजत गाजत मिरवणूक
परंपरेप्रमाणे सोमवारी सकाळी देवीच्या सुवर्ण मुखवट्याची वाजत गाजत मोहटेगाव ते मोहटा गड अशी मिरवणूक काढण्यात आली. देवीगाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. रविवारी रात्रीच घटी बसणाऱ्या महिला व मशाली घेऊन आलेले भाविक गडावर दाखल झाले होते.
नक्की वाचा : सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही; निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका
जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांच्या उपस्थितीत घटस्थापना (Mohtadevi)
मोहटा देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांच्या उपस्थितीत दिवाणी न्यायाधीश रविकिरण सपाटे, पत्नी उज्वला सपाटे (मुसळे) यांनी सपत्नीक देवीस महाभिषेक करून घटस्थापना केली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त अँड. कल्याण बडे, अँड. विक्रम वाडेकर, बाळासाहेब दहिफळे, शशिकांत दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, डॉ. श्रीधर देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.पौराहीत्य भूषनदेवा साकरे, भास्कर देशपांडे व बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. दरम्यान अनेक भाविक आपल्या गावी ज्योत घेऊन जाण्यासाठी मशाल घेऊन आले होते.