नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यात सध्या सगळीकडे पावसाने थैमान (Heavy Rain) मांडले आहे. त्यामुळे नगरमधील सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा (Tradition) सुद्धा स्थगित (Postponed) झाली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगारमधील (Bhingar) सरपण गल्लीत सुमारे साडेतीनशे वर्षांपासून दरवर्षी नवरात्रोत्सवातील तिसऱ्या माळेला अध्यात्मिक शाहिरीचा कलगीतुरा कार्यक्रम होत असतो. मात्र पावसामुळे या परंपरेला तडा गेला आहे.
नक्की वाचा: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग;जालना शहरात घडली घटना
कलगीतुऱ्यात शाहीर मांडतात विचार (Ahilyanagar News)
आता शाहीर म्हटलं की, सर्वांना हातात डफ घेऊन पहाडी स्वरात वीरश्रीचा संचार केलेली ऐतिहासिक पुरुषांच्या पराक्रमावर आधारित कवणे सादर करणारी मंडळी आठवतात. मात्र शाहिरी कवने तीन पद्धतीचे असतात. शृंगारिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक. या तीन पद्धतीची कवने शाहीर सादर करीत असतात. पृथ्वीची निर्मिती कोणापासून झाली स्त्री पासून की पुरुषापासून हा सांख्य तत्त्वज्ञानातील विचार घेऊन कलगी व तुरा परंपरेतील शाहीर आपले आध्यात्मिक विचार कवणांच्या माध्यमातून मांडत असतात. हे कलगीतुऱ्यातील शाहीर आपले विचार प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मांडतात यालाच कलगीतुरा कार्यक्रम असे म्हणतात.
अवश्य वाचा : गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका; देवेंद्र फडणवीसांनी टोचले कान
नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला कलगीतुऱ्याचे आयोजन (Ahilyanagar News)
भिंगार मध्ये नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला दरवर्षी कलगीतुरा मंडळ हे कलगीतुरा कार्यक्रमाचे आयोजन करत असते. या कार्यक्रमाला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. राज्यभरातून कलगी व तुरा परंपरेतील सुमारे ४०० पेक्षाही जास्त शाहीर आपली कला या कार्यक्रमातून सादर करत असतात. राज्यभरातील लोकसाहित्याचे अभ्यासक या कार्यक्रमाला भेट देऊन जात असतात. यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम उद्या म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला होणार होता. कार्यक्रमासाठीचे स्टेज तयार करण्यात आले होते. कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती.
मात्र, जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण, हवामान विभागाने दिलेला रेड अलर्ट व ज्येष्ठ शाहिरांची प्रकृती पाहता मंडळाने यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम स्थगित केला आहे,अशी माहिती भिंगार येथील कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब कर्डिले यांनी दिली. या परंपरेतील कार्यक्रम स्थगित होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी कोरोना संकटकाळातही एक वर्ष हा कार्यक्रम स्थगित करावा लागला होता.