नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी काल (ता.२६) एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जत-जामखेड तालुक्यांतील राजकीय स्थितीवरून भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram shinde) यांच्यातील राजकीय वादावरून भाजपला चिमटे काढले आहेत.
नक्की वाचा: ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीने बीडच्या रिक्षा चालकाने उचललं टोकाचं पाऊल!
विखेंच्या दौऱ्यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी गैरहजर (Rohit Pawar)
अहिल्यानगरच्या दक्षिण भागात मागील दीड आठवड्यापासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूर तर काही ठिकाणी अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व पीक पाहणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील मंत्र्यांना बरोबर घेत जिल्ह्यातील विविध ठिकाणी दौरे केले. यात ते कर्जत व जामखेड तालुक्यातही गेले होते. मात्र,या दौऱ्याच्यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते अनुपस्थित होते. यावेळी विखे पाटलांनी शेतकऱ्यांना दिलासा देत आश्वासने दिली.
अवश्य वाचा: ‘आत्महत्या करण्याच्या वाटेला अजिबात जाऊ नका; छगन भुजबळ यांचं ओबीसी बांधवांना आवाहन
विखे पाटलांच्या दौऱ्यानंतर लगेच राम शिंदे यांनीही कर्जत-जामखेडमध्ये पीक पाहणी दौरा केला. या दौऱ्याला भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विखे व राम शिंदे यांच्यातील राजकीय वादाचा फायदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला झाल्याची चर्चा आहे. हाच धागा पकडत रोहित पवारांनी विखे पाटलांच्या आडून राम शिंदेवर टीका केली.
रोहित पवारांची राम शिंदेंवर टीका (Rohit Pawar)
रोहित पवार यांच्या वक्तव्यात मंत्री विखे पाटलांना झुकते माप तर राम शिंदेंवर टीका दिसून आली. विखे पाटलांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने भाजपमधील अंतर्गत राजकीय वादामुळे पूर्ण होतील का ? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे विखे-शिंदे वादाचा फायदा रोहित पवार घेऊ पाहत नाहीत ना,अशी राजकीय चर्चा सध्या रंगू लागली आहे. यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या दोघांच्या भांडणाचा फायदा तिसऱ्याला तर मिळणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.