Road Problem : नगर : पावसाळा (Heavy Rain) जसा सोबत पाऊस, गारवा व हिरवळ घेऊन येतो तसाच सोबत रस्त्यांची दुर्दशा (Road Problem) व खड्यांची समस्याही घेऊ येतो. या समस्यांकडे लक्ष द्यायला प्रशासनाला (Administration) पुरेसा वेळ नसतो त्यामुळे नागरिकांनीच प्रवास करताना स्वतःच्या जीवाची काळजी घेण्याची गरज भासत आहे.
अवश्य वाचा: जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून महापालिका आयुक्त यांना अरेरावी; संपत बारस्कर यांचा आरोप
अनेक ठिकाणी बुजविलेले खड्डे पुन्हा तयार
खड्डा न दिसल्याने किंवा खड्ड्याचा अंदाज न आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता असते. पावसाळा सुरु होताच रस्त्यावरील डांबर पाण्यात विरघळते की काय असे वाटू लागते. कारण नवीन रस्ताही नागरिकांना खड्डे दाखवू लागतो. अनेक ठिकाणी बुजविलेले खड्डे पुन्हा तयार होतात. ठेकेदार हे खड्डे व्यवस्थित बुजवत नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे. खड्डे बुजवितांना खडी व डांबर टाकून बुजविले पाहिजे. पण, ठेकेदार निष्काळजीपणाने किंवा मुद्दामपणे मातीमिश्रित मुरूम टाकून बुजविताना दिसतात. हा मातीमिश्रित मुरूम पावसामुळे वाहून जातो. परिणामी पुन्हा खड्डा तयार होतो. निकृष्ट प्रतीच्या डांबरी साहित्याचा वापर केल्याने दुरुस्ती टिकाऊ होत नाही.
नक्की वाचा : कर्जत तालुक्यातील २१ हजार ८८३ शेतकऱ्यांचे १५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
खड्डे बुजविताना तात्पुरती मलमपट्टी (Road Problem)
नवीन रस्ता बनवितांना जे नियम आहेत त्यांकडे ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जाते. ठेकेदार रस्ते बनवून वर्षभरात पुन्हा त्याची डागडुजी करण्यातच धन्यता मानतात. रस्त्याचा उतार व पावसाचे पाणी वाहून जाईल यासाठी कुठलीही व्यवस्था केली जात नाही. रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने लवकरच खड्डे पडायला सुरुवात होते. हे खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा निविदा काढल्या जातात व पुन्हा तात्पुरती मलमपट्टी केली जाते. हे खड्डे बुजवितांना मोठे खड्डे बुजविले जातात व लहान खड्डे मोठे होण्यासाठी सोडून दिले जातात. या सर्वांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कोणताही आक्षेप घेतला जात नाही हे विशेष!
सर्व प्रकारचे कर भरूनही वाहनचालकांना व्यवस्थित रस्ते मिळत नाही. काही कागदपत्र असल्याचे आढळल्यास किंवा नियम मोडल्यास तात्काळ दंड केला जातो. परंतु रस्ता बनविणाऱ्या ठेकेदारावर किंवा त्याला पूर्णतेचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई किंवा ठेकेदाराला दंड झाल्याचे उदाहरण दुर्मिळ आहे. त्यामुळे सामान्य वाहचालकाच्या हातात एकाच पर्याय उरतो, तो म्हणजे स्वतःच रस्त्याने प्रवास करताना सावकाश खड्डे पाहून प्रवास करावा व स्वतःचा जीव स्वतःच सांभाळावा.
जिल्हाभर पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागातील शेतीसोबत रस्तेही वाहून गेले आहेत. आणि जे रस्ते आहेत त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यानंतरही अपघात होऊन जखमी झाल्यास किंवा जीवितहानी झाल्यास त्यास नागरिकच स्वतः जबाबदार मानला जातो. यानंतर होणाऱ्या आर्थिक व मानसिक ताणाला नागरिकांना स्वतःलाच सामोरे जावे लागते. कारण त्यानेच व्यवस्थित गाडी चालवली नसेल असे ग्राह्य धरले जाते. म्हणूनच सध्या शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा व दिवसा प्रवास करताना वेग सामान्य ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. आपली काळजी आपणच घ्यायची आहे.