Mohta Devi : आठ दिवसांच्या देवीसेवेचा समारोप; घटी बसलेल्या महिला भाविकांच्या परतीच्या प्रवासाचा भावनिक क्षण

Mohta Devi : आठ दिवसांच्या देवीसेवेचा समारोप; घटी बसलेल्या महिला भाविकांच्या परतीच्या प्रवासाचा भावनिक क्षण

0
Mohta Devi : आठ दिवसांच्या देवीसेवेचा समारोप; घटी बसलेल्या महिला भाविकांच्या परतीच्या प्रवासाचा भावनिक क्षण
Mohta Devi : आठ दिवसांच्या देवीसेवेचा समारोप; घटी बसलेल्या महिला भाविकांच्या परतीच्या प्रवासाचा भावनिक क्षण

Mohta Devi : पाथर्डी: वर्षभर आनंद, सुख-समृद्धी व कुटुंबातील सौख्य देणाऱ्या मोहटादेवीच्या (Mohta Devi) कृपेची प्रार्थना करून, शारदीय नवरात्र उत्सवात (Sharadiya Navratri Festival) घटी बसलेल्या महिला भाविकांनी अष्टमीची पूर्णाहुती पार पाडल्यानंतर आपल्या घरी परतण्याचा भावनिक प्रवास सुरू केला. घटस्थापनेपासून उपवास, खडा पहारा, गडावर आठ दिवसांचे जागरण, सायंकाळची आरती, रात्रीचे किर्तन, गडाची प्रदक्षिणा आणि देवीचे भजन अशा अनुष्ठानांमध्ये सहभागी झालेल्या या भाविकांच्या परतीच्या प्रवासाने मोहटादेवी गडाचं वातावरण भावूकतेने भरून टाकलं.

अवश्य वाचा: सीना नदी पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात

सुमारे २५०० महिला भाविकांनी घेतला सहभाग

यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी असूनही सुमारे २५०० महिला भाविकांनी सहभाग घेतला. नवरात्र उत्सवात देवस्थान समितीने त्यांच्या सोयीसाठी रहाण्याची, खिचडी-चहा यांची व्यवस्था केली होती. अष्टमीला होमाची पूर्णाहुती झाल्यानंतर महिला आपापल्या घरी परतल्या व उपवास सोडला. राज्यातील विविध भागातील अनुभवी महिला भाविकांनी वर्षानुवर्षे मोहटादेवी गडावर येऊन घटी बसण्याची परंपरा जपली आहे.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांचा कोतवाली पोलीस ठाण्यात ठिय्या

४८ वर्षांपासून घटी (Mohta Devi)

सरला बेट येथील सुंदर शिंदे मागील ४८ वर्षांपासून, आष्टी येथील शांताबाई गायकवाड ३५ वर्षांपासून, संभाजीनगर येथील सत्यभामा व्यवहारे ३३ वर्षांपासून या गडावर नियमित उपस्थित असतात. द्रोपदा देवकर (खोसपुरी), वच्छला गिराम (बीड), अनुसया दुबे (नगर), ताराबाई शिरसागर (घोटन), शकुंतला गर्जे (मोराळा) यांसह राज्यभरातील अनेक महिला भाविक या सेवा करण्यासाठी गडावर येतात. सुंदर शिंदे यांनी सांगितले, मोहटादेवी जागृत स्थान आहे. इंदिरा गांधींचे हेलिकॉप्टर दुष्काळात येथे आले तेव्हापासून मी घटी बसते. तेव्हा फक्त पत्र्याचं शेड असलेलं छोटं मंदिर होतं, मातीच्या पायऱ्यांनी मंदिरात प्रवेश होता. आठ दिवस कसे निघतात कळतही नाही. या सेवेतून आम्हाला वर्षभर ऊर्जा मिळते.

नवरात्र उत्सवासाठी महिन्यांपूर्वीच तयारी सुरू होते. महिला भाविकांनी आठ दिवस सातत्याने देवीची सेवा केली, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, श्रद्धा आणि भक्तीने संपूर्ण गडाचा परिसर दीपवत झाल्यासारखा दिसला. या सेवेतून भक्तीची ऊर्जा आणि महिला समाजाच्या आध्यात्मिक बांधिलकीचे सुंदर दर्शन घडते, असे गडावरील देवी भक्तांनी सांगितले. मोहटादेवी गडावरील नवरात्र उत्सवातील या भावनिक प्रवासात उपवास, पूजा-अर्चा, किर्तन, आरती, गड लोटांगण आणि भक्तीगाथा यांचे आठ दिवस सातत्याने अनुभवलेल्या महिला भाविकांचे अनुभव, श्रद्धा आणि उत्साह हे ठिकाणाच्या आध्यात्मिक वातावरणाला अधिक समृद्ध करतात.