Morcha : पाथर्डी : देशातील ईपीएस ९५ पेन्शनधारकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील ईपीएस पेन्शनरांनी (Employee Pension Scheme) शहरात भव्य मोर्चा (Morcha) काढून तहसीलदारांना निवेदन दिले. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती समिती पदाधिकाऱ्यांनी दिली. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भगवंत वाळके, महिला आघाडी अध्यक्षा आशा शिंदे यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली गेली नऊ वर्षे सुरू असलेल्या या आंदोलनाचा प्रवास आणि पेन्शनधारकांच्या हालअपेष्टा यांचा सविस्तर ऊहापोह करत वृद्ध पेन्शनधारकांना सन्मानाने जगण्यासाठी योग्य न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला.
नक्की वाचा : सावेडी उपनगरात युवकावर कोयत्याने हल्ला; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल
शेकडो पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी
मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष हौसराज राजळे, सचिव साहेबराव वाघ, अरुण कराळे, मोहन काळे, अशोक नेहूल, अण्णासाहेब आंधळे, भागवत पालवे, नामदेव घुले, अशोक उदमले, बाजीराव फुंदे, पद्माबाई फुंदे, विमल साळुंखे, अनुसया साळुंखे, नामदेव बढे, बबन जवणे, बबन झरेकर, आदिनाथ ससे, माऊली बेळगे, अशोक हडोळे, रावसाहेब दौंड, बाजीराव कुटे यांच्यासह शेकडो पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अवश्य वाचा : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार
निवेदनातून केंद्र सरकारकडे मागण्या (Morcha)
किमान पेन्शन एक हजार रुपयांवरून वाढवून साडेसात हजार रुपये अधिक महागाई भत्ता देण्यात यावा, ईपीएस ९५ पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा द्याव्यात, सर्व पेन्शनधारकांना कोणताही भेदभाव न करता सर्वोच्च न्यायालयाच्या ४ ऑक्टोबर २०१६ आणि ४ नोव्हेंबर २०२२ च्या निर्णयानुसार वास्तविक वेतनावर आधारित उच्च पेन्शनचा लाभ मिळावा, गैर-ईपीएस पेन्शनधारकांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन मंजूर करण्यात यावी यासह निवेदनातून केंद्र सरकारकडे मागण्या करण्यात आल्या आहेत. पाथर्डी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र शेखटकर मोर्चेकरांना सामोरे जाऊन त्यांनी निवेदन स्वीकारले.