Fraud : नगर : सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या (Digital Arrest) माध्यमातून श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांकडून तब्बल ७ कोटी १७ लाख २५ हजार रूपये लुबाडल्याचा (Fraud) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालय (Supreme Court), ईडी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून डॉक्टरांना घाबरवले व वेळोवेळी त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम हस्तांतरित करून घेतली. या प्रकरणी डॉक्टरांनी सोमवारी (ता. १३) येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, विविध मोबाईल क्रमांक व खातेदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर
व्हॉट्सॲपवर येत होते व्हिडिओ कॉल
फिर्यादी डॉक्टरांना ता. ७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल येत होते. एका कॉलमध्ये डॉक्टरांना एक नंबर पाठवून हा तुमचा नंबर आहे का? अशी चौकशी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांवर अवैध जाहिरात, अश्लीलता आणि त्रास देणे यासंबंधी प्रकरण दाखल असल्याचे सांगण्यात आले.
नक्की वाचा : चिथावणीखोर वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही : अभिषेक कळमकर
प्रत्येक हालचालीवर लक्ष असल्याचे सांगून लुबाडले (Fraud)
यानंतर आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी देविलाल सिंग आणि न्यायाधीश म्हणून सादर करत, तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले आहे असे सांगून डॉक्टरांना घरात नजरकैदेत असल्याची भीती दाखवली. त्यांनी डॉक्टरांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असल्याचे सांगून ७ कोटी १७ लाख रुपये लुबाडले. मात्र, फिर्यादीला संशय आल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.