Rajendra Falke : कर्जत-जामखेडसह (Karjat -Jamkhed) जिल्ह्याच्या राजकारणात बुधवारी (ता. १५) मोठा भूकंप घडला आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू शिलेदार अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Falke) यांनी राजीनामा (Resignation) देत खळबळ उडवून दिली. त्यांचे राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी पक्षासह विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वास्तविक पाहता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि राजेंद्र फाळके यांच्यात अनेक दिवसांपासून सख्य देखील नव्हते, हे देखील राजीनाम्याचे मोठे कारण असू शकते असा तर्क लावला जात आहे.
नक्की वाचा: मोठी बातमी! कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच आरोपींची जामिनावर सुटका
जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याने स्थानिक राजकारणात उलथापालथ (Rajendra Falke)
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र फाळके यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याने स्थानिक राजकारणात उलथापालथ घडली आहे. फाळके राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. बुधवारी त्यांनी सोशल मीडियावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, राजेंद्र फाळके यांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण २०१८ मध्ये अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. आज जवळपास ७ वर्षांहून अधिकचा काळ झालेला असून पक्षामध्ये नवीन चेहऱ्याला संधी मिळणे अपेक्षित आहे. तसेच माझ्या कौटुंबिक कारणास्तव मी माझ्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. हा राजीनामा मंजूर करावा असे पत्रात नमूद केले आहे.
अवश्य वाचा: पाकिस्तान पुन्हा पहलगामसारखा हल्ला करू शकतो;भारतीय वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा इशारा
आमदार रोहित पवार आणि राजेंद्र फाळके यांच्या राजकीय संबंधात फार गोडवा नव्हता, अशी चर्चा आहे. तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून फाळके नगर जिल्ह्यात काम करीत असताना आपल्या स्वतःच्या होम ग्राऊंडवर आणि रोहित पवार यांच्या कर्जत- जामखेडमध्ये जास्त लक्ष देखील देत नव्हते. अनेक राजकीय कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती याची प्रचिती देत होते. त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क बांधले जात आहे. याबाबत राजेंद्र फाळके यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मतदारसंघातील दोन तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा (Rajendra Falke)
मागील तीन वर्षांपासून कर्जतचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रिक्त असून नुकतेच जामखेडचे तालुकाध्यक्ष दत्ता वारे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा प्रसिद्धी माध्यमासमोर दिला आहे. आणि बुधवारी जिल्हाध्यक्ष असणारे राजेंद्र फाळके यांनी राजीनामा दिल्याने आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात ते पक्ष संघटनात कमी पडतात काय ? असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.