Mohta Devi : पाथर्डी: लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान असलेल्या श्री क्षेत्र मोहटादेवी (Mohta Devi) गडावर दीपावली (Diwali) निमित्त विद्युत रोषणाईचा मनमोहक सोहळा सुरू असून, संपूर्ण परिसर तेजोमय झाला आहे. देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत दिव्यांच्या रोषणाईने मंदिर परिसर प्रकाशाने झळाळून निघाला आहे.
नक्की वाचा : दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास
राज्यभरातील भाविक दर्शनासाठी गडावर
सध्या दीपावलीच्या सुट्ट्या सुरू असल्याने राज्यभरातील भाविक आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी मोहटादेवी गडावर मोठ्या संख्येने येत आहेत. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी रांगा लागतात, तर संध्याकाळी उजळलेल्या रोषणाईत मंदिराचा परिसर अद्भुत भासतो. विविध रंगांच्या अत्याधुनिक एलईडी दिव्यांनी मंदिर, सभामंडप, दीपस्तंभ आणि प्रवेशद्वार सजविण्यात आले असून, दिव्यांच्या झगमगाटात देवीचे मंदिर आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
अवश्य वाचा : शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठाण;गुन्हा दाखल
देवस्थान समितीकडून काटेकोर व्यवस्था (Mohta Devi)
देवस्थान समितीने भाविकांच्या सोयीसाठी गड परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच सुरक्षेचीही काटेकोर व्यवस्था केली आहे. देवस्थानचे सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त, स्वयंसेवकांची टीम भक्तांच्या मार्गदर्शनासाठी सतत तैनात आहे. तसेच मंदिर परिसरात दिपावलीचे वातावरण अधिक साजरे करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम, भजन संध्या आणि दीपोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. राज्यभरातील देवीभक्त दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपल्या कुटुंबासह मोहटादेवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या उत्साहाने गडावर दाखल होत आहेत.
नागरिकांबरोबर भाविकांच्या गर्दीमुळे पाथर्डी शहरात वाहतुक मोठ्या प्रमाणात वाहत आहे. मोहटादेवी गड हे केवळ धार्मिक स्थळ नसून, संपूर्ण राज्याचे श्रद्धेचा आणि संस्कृतीचा दीपस्तंभ मानला जातो. अशा या पवित्र स्थळी दीपावलीचा उत्सव म्हणजे भक्तांसाठी अद्वितीय आनंदाचा क्षण असतो. मंदिराच्या विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर दैवी तेजाने उजळला असून, दर्शनार्थी भक्त मंत्रमुग्ध झाले आहेत.