Theft : पाथर्डी : (Pathardi) शहरातील कसबा पेठ भागात महिलांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरले आहे. चोरी (Theft) करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन महिलांना स्थानिक महिलांनी प्रतिकार करत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक महिला पकडण्यात नागरिकांना यश आले असून तिची साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील
एका महिलेला पकडले, तर दुसरी पळून जाण्यात यशस्वी
रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन बुरखाधारी महिलांनी कसबा पेठ येथील ब्राह्मण गल्ली येथील रंजना वारुळे यांच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर त्या थेट वरच्या मजल्यावर गेल्या. त्यावेळी रंजना वारुळे स्वतः घरात उपस्थित होत्या. अज्ञात महिलांच्या हालचालीवर त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी त्यांना विचारणा केली असता, संशयित महिलांनी घराची कडी लावून वारुळे यांच्यावर झडप घातली. या झटापटीत रंजना वारुळे यांनी चोरट्या महिलांचा धाडसाने प्रतिकार करत त्यांचा उद्देश हाणून पाडला. वारुळे यांच्या प्रतिकारामुळे चोरट्या महिलांनी गोंधळून पळ काढला. दरम्यान, जवळच राहणाऱ्या सुरेखा नागेश भोसले यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्परतेने एका महिलेला पकडले, तर दुसरी महिला पळून जाण्यात यशस्वी झाली. ह्या महिला घरात घुसून स्प्रे मारून चोरी करत होत्या अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश (Theft)
या दोन महिलांपैकी एकीकडे चाकू होता, तर दुसरी महिलेकडे पिशवीत मिरची पावडर आणि प्लास्टिकची बंदूक आढळून आली. चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. रंजना वारुळे आणि सुरेखा भोसले या दोघींनी दाखवलेले धाडस नागरिकांत कौतुकाचा विषय ठरला आहे. यानंतर नागरिकांच्या मदतीने पकडलेली महिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तिचे नाव कोमल रवी जाधव असल्याचे सांगितले असून ती पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील तुळजापूर पेठ येथील रहिवासी असल्याची माहिती दिली आहे. पाथर्डी पोलीस पुढील तपास करीत आहेत.



