Pro Kabaddi : कर्जत : “एकीकडे मी सोडून इतर सर्व खेळाडू मॅटच्या बाहेर होते. मी बदली खेळाडू म्हणून संघात अंतिम क्षणी मॅटवर असताना शेवटची रेड मलाच मिळाली. समोर पटना पायरेट्सचा (Patna Pirates) पूर्ण संघ आणि माझी ३० सेकंदाची रेड पूर्ण करून एक-दोन खेळाडू बाद करीत अतिरिक्त बोनस गुण घेण्याचा विचार डोक्यात असताना खेळ पालटेलं असे ध्यानी मनी नसताना त्यावेळी किती खेळाडूंना टच केलं हे लक्षात पण नव्हते. लक्ष्य होते फक्त मध्यरेषा पार करणे आणि ती पार केली. जेव्हा माझ्या संघाच्या मैदानात गेलो तेव्हा कळले की मी ६ गडी बाद करून एक बोनस घेत प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi) इतिहासातील सर्वाधिक गुणांची रेड पार केली,” असे प्रतिपादन बंगळुरू बुल्सच्या शुभम बिटके (Shubham Bitake) यांनी केले. ते कर्जत येथे रविशंकर विद्यामंदिराच्या सन्मान प्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यामंदिराचे प्रमुख कार्यवाहक नंदकुमार लांगोरे यांनी शुभमचा माजी विद्यार्थी म्हणून सत्कार केला.
नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यात तरतूद नाही
सर्वाधिक गुणांचा विक्रम शुभम बिटकेच्या नावावर
प्रो कबड्डीच्या इतिहासात एकाच रेडमध्ये तब्बल सात गुण घेत एक विक्रमी रेड कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील शुभम भाऊसाहेब बिटके याने सोमवारी पटना पायरेट्सच्या विरोधात पार पडली. त्या एका रेडने शुभमने आजमितीसच्या सर्वाधिक गुणांचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. शुभम आपल्या गावी आल्यानंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या रविशंकर विद्यामंदिरात त्याचा शिक्षकांनी सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी रविशंकर विद्यामंदिराचे प्रमुख कार्यवाहक नंदकुमार लांगोरे यांनी शुभम आणि त्याच्या वडिलांचा सन्मान केला.

अवश्य वाचा: लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार
शुभमने व्यक्त केले मनोगतात (Pro Kabaddi)
यावेळी बोलताना शुभम याने त्या दिवशीचा रेडचा थरार सर्वांसमोर कथन केला. मी बदली खेळाडू म्हणून संघात आलो. मी सोडून पूर्ण संघ मॅटच्या बाहेर असताना एक दडपण होते. रेडपूर्वी समोर पटनाचा पूर्ण संघ मैदानात होता. एक-दोन टच करून बोनस गुण घेण्याचा विचार करीत रेड करत असताना अचानक पूर्ण संघालाच टच करून त्यांच्या तावडीतून सुटत मध्यरेषा गाठली. ज्यावेळी मॅच रेफरी आणि पंचांनी पटना संघातील बाद खेळाडूंची मोजदाद सुरू केली. तेव्हा मी सात गुणांची विक्रमी रेड हे समजले. मनात आनंद होताच. पण तो आनंद आणि माझी रेड संघाला विजयाच्या कामी आली असती तर आणखी आनंद नक्की झाला असता.
खेळात हार-जीत असते. परंतु जो सर्वोत्तम खेळतो तो मैदान मारतो हे पुन्हा एकदा सिद्ध होते. खेळाचे मैदान हीच जिद्द आणि प्रेरणा देत असते. त्यामुळे कठीण प्रसंगात हार न मानता त्यास समोर गेल्यास निश्चित यश मिळते असे शुभमने आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी शुभमचे वडील भाऊसाहेब बिटके, पत्रकार मुन्ना पठाण, डॉ. अफरोजखान पठाण यांच्यासह मुख्याध्यापिका सविता बळे यांच्यासह रविशंकर विद्यामंदिराचे सर्व शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका बनकर यांनी केले तर आभार संजय मडके यांनी मानले.



