ICC Womens World Cup 2025:भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!

0
ICC Womens World Cup 2025:भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!
ICC Womens World Cup 2025:भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!

ICC Womens World Cup 2025: नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला विश्वचषक २०२५ च्या (Womens World Cup 2025)फायनलमध्ये भारतीय महिला संघाने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून पहिल्यांदा विश्वविजेता (World Champion) बनवण्याचा मान मिळविलाय. विजेतेपद जिंकल्यानंतर, भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) इतर खेळाडूंप्रमाणे, स्वतःला आवरू शकली नाही. विजयानंतर भावनिक झालेल्या हरमनप्रीतने स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) मिठी मारली. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह इतर खेळाडूंनी मैदानात जोरदार सेलिब्रेशन केले.आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याकडून भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्वचषकाची ट्रॉफी देण्यात आली.

नक्की वाचा :  राज ठाकरेंचा ‘सत्याचा मोर्चा’ नेमका कशासाठी ?  

भारताने पहिल्यांदा मिळविला महिला विश्वचषक (ICC Womens World Cup 2025)

महिला विश्वचषक हा १९७३ मध्ये सुरू झाला होता. परंतु भारतीय संघाला कधीही विश्वविजेतेपद मिळवता आले नव्हते. पूर्वी, फक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडनेच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. महिला एकदिवसीय क्रिकेटला शेवटचा नवीन विजेता २००० मध्ये मिळाला होता, जेव्हा न्यूझीलंडने जेतेपद पटकावले. त्यापूर्वी आणि तेव्हापासून, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच या खेळाचे विजेते राहिलेत. अखेर हरमनप्रीत कौर च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने यापूर्वी २००५ आणि २०१७ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांना यश मिळवता आलं नव्हतं.  

अवश्य वाचा: आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी;९ जणांचा मृत्यू     

फायनलमध्ये नेमकं काय घडलं ? (ICC Womens World Cup 2025)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने  ७ बाद २९८ धावा केल्या. शेफाली वर्मा सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. तिने ७८चेंडूत ८७ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. शेफालीने स्मृती मानधना सोबत १०४ धावांची सलामी भागीदारी केली. दीप्ती शर्मानेही ५८ धावा केल्या, रिचा घोषने २४ चेंडूत ३४ धावा केल्या, जेमिमाह रॉड्रिग्जने २४ आणि हरमनप्रीत कौरने २० धावा केल्या.

भारताच्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्डने शतक केले.  तर अ‍ॅनेरी डिर्कसेनने ३५, सन लुसने २५ आणि तंजीम ब्रिट्सने २३ धावा केल्या. तरीही दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून दीप्ती शर्माने सामना फिरवून टाकणारी गोलंदाजी केली. दीप्ती शर्माने उजव्या हाताच्या फिरकीपटूने ९. ३ षटकांत ३९ धावा देत ५ विकेट्स पटकावल्या. शेफाली वर्माने दोन आणि श्री चरणीने एक विकेट घेतली.

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज देखील विश्वचषक जिंकल्यानंतर या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. तर विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी मैदानातील खेळपट्टीवर भारतीय तिंरगा रोवत आनंद साजरा केला.