Uday Samant : नगर : शिर्डी (Shirdi) औद्योगिक वसाहतीतील ६०० एकर परिसरात भविष्यात विविध उद्योग उभारले जाणार असून, या उद्योगांच्या स्थापनेदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचे (Law and Order) प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी उद्योजकांनी रोजगार देताना किमान ८० टक्के स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री डॉ. उदय सामंत (Uday Samant) यांनी केले.
अवश्य वाचा : भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!
टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन
शिर्डी औद्योगिक वसाहतीतील श्री सदगुरू नारायणगिरी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्र यांच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराव मुळीक, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड, उपविभागीय अधिकारी माणिक आहिरे, टाटा टेक्नॉलॉजीचे सुशीलकुमार, टाटा कन्सल्टन्सीचे समन्वयक प्रितम गांजेवार, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, कैलास कोते, अभय शेळके आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड
उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, (Uday Samant)
राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यासाठी स्वर्गीय रतन टाटा यांच्याकडे ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यावर त्यांनी तब्बल ८०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. या निधीतून शिर्डी औद्योगिक वसाहतीत कौशल्यवर्धन केंद्र उभारले जात आहे. हे केंद्र स्थानिक युवकांच्या कौशल्य वृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, या परिसराचा औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
राज्य शासनाने औद्योगिक विकासासाठी शिर्डीत ६०० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत देशात पहिल्या क्रमांकावर असून, उद्योजकांना सक्षम बनविण्याचे कार्य शासनाने केले आहे. दावोस येथे १५ लाख कोटी रुपयांचे औद्योगिक करार करण्यात आले असून, त्यापैकी ८० करारांची अंमलबजावणी झाली आहे. शासनाने उद्योग परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ केली असून, ‘मैत्री पोर्टल’ वर अर्ज केल्यास नवीन उद्योगांना ३० दिवसांच्या आत सर्व विभागांची मान्यता मिळते. मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या जेम्स अँड ज्वेलरी पार्क उद्योगांसाठी रत्नागिरी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून अनेक तरुणांना ज्वेलरी उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शिर्डीतही जेम्स अँड ज्वेलरी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. सामंत यांनी दिली.



