Heavy Rain : कर्जत तालुक्यात सरासरी सहा महिने कोसळत आहे वरूणराजा

Heavy Rain : कर्जत तालुक्यात सरासरी सहा महिने कोसळत आहे वरूणराजा

0
Heavy Rain : कर्जत तालुक्यात सरासरी सहा महिने कोसळत आहे वरूणराजा
Heavy Rain : कर्जत तालुक्यात सरासरी सहा महिने कोसळत आहे वरूणराजा

Heavy Rain : कर्जत : कर्जत शहर आणि तालुक्यात दिवाळीनंतर (Diwali) देखील दोनदा-तीनदा जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना नको रे बाबा म्हणायची वेळ आणली आहे. शनिवारी तब्बल दीड तास पावसाने कर्जत शहरात बॅटिंग करीत सर्वत्र पाणीच पाणी केले होते. शनिवारी कर्जत तालुक्यातील भांबोरा मंडळात सर्वाधिक ३७.५ मिमी पावसाने नोंद केली. मे मध्यानात सुरू झालेल्या विक्रमी अवकाळीनंतर ऑक्टोबर महिन्यात देखील कर्जत तालुक्यात (Karjat Taluka) सरासरी ६० मिमी पावसाने नोंद लावली.

अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ऑक्टोबर पाठोपाठ नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस

दिवाळीनंतर पाऊस उसंत घेत गुलाबी थंडीची चाहूल लागते. मात्र, यंदा वरुणराजा आजमितीस थांबायचे नावच न घेऊ लागल्याने ऑक्टोबर पाठोपाठ नोव्हेंबरमध्ये देखील पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे. या जोरदार पावसाने रब्बी हंगामास उशीर होत असून पिके लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मे महिन्याच्या मध्यानात १५ दिवसाच्या अवकाळी पावसाने तब्बल ३५० मिमी विक्रमी नोंद लावत सर्वसामान्यांची दाणादाण उडवली होती. या काळातच कर्जत तालुक्यातील नद्या-नाले, ओढे, बहुतांश बंधारे खळखळून वाहिले. त्यांनतर मान्सून पावसाने देखील कर्जत तालुक्यास चांगलेच झोडपत अनेक महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद लावली. कधी नव्हे ती सीनामाई जून महिन्यातच ओसंडून वाहत १४ जूनलाच निमगाव गांगर्डाचे सीना धरण ओव्हरफ्लो झाले.

नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

दिवाळीनंतर दोन-तीन मोठ्या स्वरूपाचे पाऊस (Heavy Rain)

तदनंतर सप्टेंबर महिन्यात तर पंधरा दिवसात अतिवृष्टीने सीनानदीने रौद्ररूप धारण करीत लाभक्षेत्रात हाहाकार घडवला. दुसरीकडे भीमानदी देखील उफानावर येत तिने कर्जत-सिद्धटेक- दौंडचा संपर्क तोडला होता. सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवल्यानंतर लोकांनी उसंत घेताच ऑक्टोबर महिन्यात देखील कर्जत तालुक्यात सरासरी ६० मिमी पावसाने नोंद लावलीच. यात भांबोरा मंडळात सर्वाधिक ९२ मिमी पाऊस पडला. तर सर्वात कमी मिरजगाव मंडळात ३७ मिमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे दिवाळी सणानंतर दोन-तीन मोठ्या स्वरूपाचे पाऊस झाले. पावसाची तीच प्रथा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी कायम राहिली.

शनिवारी कर्जत शहर, वालवड, कोरेगाव आणि भांबोरा मंडळात जोरदार पाऊस झाला. या पावसाने पुन्हा एकदा कर्जत तालुक्याची दाणादाण उडवली. पावसाचे सत्र सुरूच असल्याने रब्बी हंगामावर याचा परीणाम दिसत असून अनेक भागात शेतकरी वर्ग पेरणी करण्यास धजावत नसल्याचे जाणकार मंडळी सांगत आहे.

कर्जत तालुक्यातील १० महसुली मंडळात नोव्हेंबर महिन्याच्या शनिवारी पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसात ऑक्टोबरची सरासरीकर्जत २४ मिमी (७१.३मिमी), राशीन ९.८ मिमी (५३.६ मिमी), भांबोरा ३७.५ मिमी (९२ मिमी), कोंभळी ६ मिमी (६४.६ मिमी), मिरजगाव २१.३ मिमी (३७ मिमी), माही २१ मिमी (४७ मिमी), कुळधरण १ मिमी (४७ मिमी), वालवड २४ मिमी (७१.३ मिमी), खेड ८ मिमी ( ५१.८ मिमी) आणि कोरेगाव २४ मिमी (६०.५ मिमी) पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी दिली.