Share Market : नगर : अहिल्यानगर येथे शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणुकीतून जास्त नफ्याचे आमिष दाखवून नगरमधील एका नोकरदाराची तब्बल ३ कोटी ३ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २ ऑगस्ट २०२५ ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी सोमवारी (ता.३) तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
या व्यक्तींवर गुन्हा दाखल
याबाबत साक्षी गुप्ता, जितेन दोषी व विक्रम शहा (पूर्ण नाव व पत्ते माहीत नाहीत) यांच्यासह काही अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडी उपनगरातील रासनेनगर मध्ये राहणाऱ्या ६१ वर्षीय नोकरदाराने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शेअर मार्केट बाबत सोशल मिडीयावर माहिती घेत असताना त्यांची साक्षी गुप्ता, जितेन दोषी व विक्रम शहा यांच्याशी सोशल मिडीयावर ओळख झाली. त्यांनी वेगवेगळ्या व्हॉटसअप ग्रुप मध्ये घेतले. त्या ग्रुपवर संशयित आरोपी जितेन दोषी व इतरांनी शेअर मार्केट बाबत माहिती देत इतर ग्रुप सदस्यांना किती व कसा नफा झाला, हे पटवून देत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना एक लिंक पाठवून ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला लावले.
नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
शेअर्स आणि आयपीओ खरेदी केल्याचे भासविले (Share Market)
या ॲपच्या माध्यमातून फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठवायला सांगितले. फिर्यादी यांनी २ ऑगस्ट ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तब्बल ३ कोटी ३ लाख १५ हजार रुपये हे आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यावर पाठविले. त्यातून शेअर्स आणि आयपीओ खरेदी केल्याचे फिर्यादीस भासविले. ही निव्वळ बनवा बनवी असल्याचे लक्षात आले. आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी ३ नोव्हेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोंटला हे करत आहेत.



