Leopard Attack : कोपरगाव : तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) एका चार वर्षीय बालिकेचा मृत्यू (Death) झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मयत मुलीचा मृतदेह (Dead Body) घेऊन टाकळी फाटा येथे नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला. तसेच प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करत हा बिबट्या नरभक्षक बनला असून त्याला ठार करा, असा आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर ठिय्या दिला.
अवश्य वाचा: आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील
रात्री अकरापर्यंत रास्ता रोको
या घटनेत मयत झालेल्या मुलीचे नाव नंदिनी प्रेमदास चव्हाण असे आहे. हे कुटुंब ऊस तोडणी करण्यासाठी कोपरगाव येथे आले आहे. संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको दरम्यान वनाधिकारी यांनी त्या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतरही ग्रामस्थांनी तालुक्यातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आक्रमक भूमिका घेत रात्री अकरापर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवला होता. कोपरगाव पोलीस प्रशासनासह शिर्डी पोलीस पोलीस प्रशासन, शीघ्र कृती दलाचे जवान या ठिकाणी हजर झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
नक्की वाचा : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला
आता तरी प्रशासन जागे होणार का? (Leopard Attack)
कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. गेल्या आठवड्याभरात बिबट्याने लहान मुलांसह नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना ताज्या असतानाच या ऊस तोड कामगारांच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेत तिला ठार केले आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का? या बिबट्याचा बंदोबस्त करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



