
Sangamner Municipality : संगमनेर : नगरपालिकेच्या निवडणुकीची (Election) रणधुमाळी आता रंगात आली असून, यंदा नगराध्यक्ष पद हे खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव ठरले आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा ‘महिला राज’ पाहायला मिळणार आहे. अनेक वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेवर (Sangamner Municipality) काँग्रेसचा वर्चस्व राहिले असले, तरी या वेळी विधानसभेतील राजकीय (Political) बदलांमुळे सत्तेचा खेळ पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अवश्य वाचा: आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील
चाळीस वर्षांपासून काँग्रेसचे टिकवले वर्चस्व
गेल्या चाळीस वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व टिकले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने सत्ता राखली. मात्र आता विधानसभेत झालेल्या बदलांमुळे समीकरणे पालटली आहेत. आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने आपले बस्तान घट्ट केले असून, पालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचे महायुतीचे कार्यकर्ते म्हणत आहेत.
नक्की वाचा : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला
काही दिवसांपासून प्रभागनिहाय दौरे सुरू (Sangamner Municipality)
महायुतीकडून आमदार अमोल खताळ स्वतः रिंगणात उतरले असून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रभागनिहाय दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे, शहर विकास आघाडीच्या रणनितीची सूत्रे या वेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या हाती आहेत. त्यामुळे थोरात गट आणि तांबे गटातील अंतर्गत समन्वय कसा राहतो, हेही लक्षवेधी ठरणार आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या १५ प्रभागांत एकूण ३० नगरसेवक निवडले जाणार आहेत. आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक १, ५, ८, ११, १३ मध्ये महिलांसाठी आरक्षित जागा आहेत. मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि खुल्या वर्गांतील महिलांना या वेळी मोठी संधी मिळाली आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या असून काही ठिकाणी गटबाजीचे चित्रही स्पष्ट दिसत आहे. उमेदवारीसाठी नेत्यांकडे अर्जांची रास लागली आहे. महिलांसाठी खुल्या प्रवर्गात राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस वाढली आहे.महायुतीकडून पत्रकार स्मिता गुणे, रेखा गलांडे, उषा नावंदर, सुषमा तवरेज, आणि भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे या नावांची चर्चा आहे. तर शहर विकास आघाडीकडून माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या दोघींच्या नावावर जोरदार चर्चा सुरू आहे. महिला उमेदवारांच्या या स्पर्धेमुळे संगमनेरमधील राजकारण अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट आहे.
यावेळी संगमनेरमध्ये थेट महायुती विरुद्ध शहर विकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती मैदानात उतरणार असून, दुसरीकडे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी सज्ज आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव असल्याने अनेक नवीन चेहरे यावेळी निवडणुकीत दिसतील. काँग्रेसची परंपरागत सत्ता कायम राहते का, की महायुती नवीन इतिहास रचते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. संगमनेरच्या मतदारराजाने यापूर्वी विचारपूर्वक मतदान केले आहे. त्यामुळे कोणाच्या पारड्यात सत्ता जाते, याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. अखेरीस, संगमनेरच्या नगरपालिकेची निवडणूक यंदा महिला नेतृत्व, राजकीय नव्या समीकरणे आणि सत्तास्पर्धेच्या रंगतदार पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ठरणार आहे.


