
Fraud : नगर : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे, खोटे मालक उभे करून आणि बनावट सह्यांच्या आधारे सावेडी येथील डॉक्टरची तब्बल १४ कोटी ६६ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) मुख्य संशयित आरोपी भाजपचा माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे (Swapnil Shinde), अमोल जाधव आणि त्यांच्या इतर ३० जणांच्या टोळीविरोधात कटकारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
बनावट मालक व खोटे लोक उभे करून फसवणूक
हा प्रकार डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत निंबळक (ता. नगर) गावच्या शिवारात घडला आहे.याबाबत डॉ. अनिल आठरे पाटील (वय ७३, रा. झोपडी कॅन्टीन समोर, आठरे पाटील हॉस्पीटल, सावेडी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित आरोपी माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे, अमोल जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून हा कट रचला. संशयित आरोपींनी डॉ.आठरे यांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती दाखवल्या. इतकेच नाही, तर बनावट मालक व खोटे लोक उभे करून, त्यांच्या बनावट सह्या करून फिर्यादीला दस्त हस्तांतरित केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी डॉ. आठरे यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. त्यांची १४ कोटी ६६ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
या व्यक्तींवर गुन्हा दाखल (Fraud)
डॉ. आठरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी स्वप्नील शिंदे, अमोल जाधव, भाऊसाहेब नागदे, चंद्रशेखर शिंदे, सिराज (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही), दत्तू सस्ते, श्रीकांत आल्हाट, रॉकी कांबळे, सुनील देसाई, अनिल देसाई, सुमन देसाई, ज्योती कांबळे, प्रशांत गायकवाड, महेश कुर्हे, अरूण खरात, गणेश तकडे, गणेश साबळे, लखण भोसले, विजय वैरागर, भारत फुलमाळी, रामा पवार, प्रेमचंद होनचंद कांबळे, वैशाली स्वामी, मिनल स्वामी, सुनील वैरागर, संतोष कदम, साजीद शेख, संजय आल्हाट, सचिन शिंदे आणि इतर अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


