
Relief Fund Distribution : पाथर्डी : तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील बियाणांसाठी अनुदान (Relief Fund Distribution) मिळण्यासाठी सरकारकडून निधी वर्ग करण्यास सुरुवात झाली असली, तरी अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम न आल्याने बुधवारी तहसील कार्यालयात (Tehsil Office) शेतकऱ्यांची गर्दी झाली. आपली रक्कम खात्यात कधी जमा होणार, याची चौकशी करण्यासाठी सकाळपासून शेतकरी कार्यालयात उभे दिसले. मात्र पुढील काही दिवसात पात्र लाभार्थ्यांना त्यांची अनुदान रक्कम मिळणार असल्याचे तहसील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
प्रति हेक्टरी १० हजार रुपये इतके अनुदान
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने अनुदान ठरवून रक्कम जाहीर करून ती वितरित करण्याला सुरुवात केली. तर प्रति हेक्टरी १० हजार रुपये इतके अनुदान शेतकऱ्याला मंजूर केले असून, हे तीन हेक्टरपर्यंत क्षेत्रधारक शेतकऱ्यांना लागू आहे. या अनुदानातून रब्बी हंगामासाठी बियाणे आणि अन्य शेती खर्च भागवण्यासाठी मदत मिळणार आहे.
नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल
केवायसी, फार्मर आयडी अद्ययावत नसल्याचे कारण (Relief Fund Distribution)
तालुक्यातील सुमारे ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. शासनाने या भागासाठी एकूण १०७ कोटी रुपये अतिवृष्टी अनुदान आणि ७८ कोटी रुपये रब्बी हंगाम बियाणे खरेदीसाठी, अशी मिळून १८५ कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. यापैकी अतिवृष्टीची सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, उर्वरित रक्कम पुढील काही दिवसांत वर्ग होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले असताना, अनेक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे ‘केवायसी’, ‘फार्मर आयडी’ व ‘आधार सीडिंग’ अद्ययावत नसणे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्यांच्या खात्यांत ही माहिती पूर्ण नाही, त्यांच्या अनुदानाच्या रकमा तात्पुरत्या रोखल्या गेल्या आहेत. येत्या काही दिवसांत सेतू कार्यालयाच्या माध्यमातून ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा होईल, असे तहसील प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, शासनाने स्पष्ट केले आहे की, अनुदानापासून कोणीही वंचित राहणार नाही आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने निधी वर्ग केला जाणार आहे. दोन दिवसांपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बी बियाणे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली असून, उर्वरितांना पुढील आठ-दहा दिवसांत पैसे मिळतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने गर्दी घाई गडबड करू नये असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे :
अतिवृष्टी व रब्बी हंगाम बियाणे अनुदानासाठी १८५ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर
१० हजार रुपये प्रति हेक्टरी दराने रब्बी बियाणांच्या अनुदानासाठी,
३ हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना लागू
काही शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त, काहींना अद्याप प्रतीक्षा
फार्मर आयडी,केवायसी व आधार सीडिंग’ पूर्ण नसल्याने रक्कम रोखलेली
तहसील कार्यालयात चौकशीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी


