Leopard : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा, डोंगरगण, जेऊर, इसळक, निंबळक, खारे कर्जुने, टाकळी खातगाव, नेप्ती, हिंगणगाव, जखणगाव, हमीदपूर या भागांमध्ये गेल्या एक महिन्यापासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. आज खारे कर्जुने परिसरातून दोन बिबटे वन विभागाच्या (Forest Department) पथकाने गजाआड केले आहेत. या बिबट्याच्या (Leopard) दहशतीमुळे शेतकरी धास्तावले असून शेतावर मजूर (Farm Workers) कामावर येईनात अशी परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
बिबट्याच्या भीतीने जनावरांचे हाल
खारे कर्जुने, इसळक येथील लहान मुलावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच टाकळी खतगाव, नेप्ती या परिसरामध्ये ऊस क्षेत्र वाढल्याने बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसाही शेतकरी आणि शेतमजूर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. जनावरांसाठी ऊस, मका, घास, चारा पिके घेण्यासाठी महिलांना शेतात जावे लागते. बिबट्याच्या भीतीने जनावरांचे हाल सुरू झाले असून, महिला वर्गामध्ये फक्त बिबट्याची चर्चा सुरू आहे.
नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई
या गावात बिबट्यांचा जास्त वावर
शाळेत पायी जाणाऱ्या मुले-मुली यांनाही दुचाकीवरून सोडवण्याची वेळ पालकांवर आली आहे. शाळेमध्ये उपस्थिती कमी प्रमाणात आढळत आहे. यामुळे शेतीच्या कामाचा प्रश्न तयार झाला आहे. मजूर काम करण्यास धजावत नाहीत. मांजरसुंबा, डोंगरगण, जेऊर, चापेवाडी, टाकळी, खातगाव, जखणगाव, हिंगणगाव नेप्ती, निमगाव वाघा, इसळक, निंबळक, खारे कर्जुने, निमगाव घाणा, दहावा मैल, हमीदपूर या गावात बिबट्यांचा जास्त वावर असल्याचे बोलले जात आहे. नगरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये वनविभागाने तातडीने ड्रोन सर्वेक्षण करून बिबट्यांची संख्या निश्चित करावी व त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी टाकळी खातगावचे उपसरपंच सरपंच सुनीता नरवडे, सुनील नरवडे, राजाराम नरवडे, सुदाम शिंदे, मच्छिंद्र जाधव यांनी केली आहे. बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



