
Municipal Elections : नगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी (Municipal Elections) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष (Mayor) व नगरसेवक (Corporators) पदासाठी अंतिम दिवशी अनेक दिग्गजांचे अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील १२ नगरपालिका व एक नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदाच्या २८९ जागांसाठी दोन हजार २९३ तर १२ नगराध्यक्षपदांसाठी १८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज छाननीची प्रक्रिया होणार आहे.
अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
संगमनेर नगरपालिकेत मोठी राजकीय हालचाल
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचत असताना नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल प्रक्रियेत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. महायुतीच्या वतीने आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा संदीप खताळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर संगमनेर सेवा समितीच्या वतीने डॉ. मैथिली सत्यजीत तांबे तसेच माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक पंचरंगी होणार (Municipal Elections)
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी श्रीगोंद्यात कोणत्याही पक्षांमध्ये मनोमिलन किंवा युती न साधल्याने यंदाची निवडणूक पंचरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), महाविकास आघाडी, शिवसेना (शिंदे गट) आणि अपक्ष शहर विकास आघाडी या प्रमुख पॅनेल्ससोबतच आम आदमी पार्टी व अनेक अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक रंगवली आहे.
देवळाली प्रवरा नगर पालिका सार्वत्रिक निवडणूकीत शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल करण्यासाठी राजकीय पक्षासह सर्वांचीच धांदल उडाली असून नगराध्यक्ष पदासाठी ११ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रभागात नगरसेवक पदासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. अजित पवार व शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादीने निवडणूकीकडे पाठ फिरविली असल्याने कार्यकर्त्यांनी आधे इधर आधे उधर अशी भुमिका घेत काँग्रेस व शिंदे गटाच्या शिवसेनेतून उमेदवारी घेतली आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी देवळालीत भाजपला आतून पाठिंबा दिल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एकंदरीत देवळाली प्रवरात चौरंगी लढत होणार आहे. भाजप व काँग्रेस वगळता कोणत्याही पक्षाला पुर्ण जागेवर उमेदवार मिळाले नसल्याने लंगडे पँनल उभे करण्याची नामूष्की ओढवली आहे. नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारांनी तर १० प्रभागासाठी ११९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
राहाता नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ४ व नगरसेवक पदासाठी ७९ अर्ज दाखल झाले असून आता नगराध्यक्ष पदासाठी एकूण ९ उमेदवार मैदानात आहेत. यामध्ये महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ. स्वाधीन किसनराव गाडेकर तर राहाता शहर महाविकास आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर, आम आदमी पार्टीकडून रामनाथ भाऊसाहेब सदाफळ व बहुजन समाज पार्टीकडून अनिल दगडू पावटे, राष्ट्रीय जनमंच पक्षाकडून बाळासाहेब सखाराम गिधाड तसेच अपक्ष भानुदास भिकाजी गाडेकर, तुषार गणेश सदाफळ व राजेंद्र सखाराम पठारे यांनी दोन अर्ज दाखल केले.
शेवगाव नगर परिषदेमध्ये माया अरुण मुंढे यांनी शिंदे गटाकडून शेवगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माया मुंढे या भाजपचे प्रदेश सरचिटणीस व अहिल्यानगरचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या पत्नी आहेत. मागील २५ वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय आहे. तसेच ते पंकजा मुंडे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सभापती सभापती राम शिंदे व देवेंद्र फडवणीस यांचे खंदे समर्थक मानले जातात. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ९ उमेदवारांकडुन १५ अर्ज दाखल झाले असून १५ प्रभागातील ३० नगरसेवक पदासाठी २२१ असे एकूण २३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे व तहसीलदार महेश सावंत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


