
Swachh Bharat Mission : नगर : केंद्र व राज्य शासनाच्या (Central and State Government) मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून, जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन (International Human Rights Day) म्हणजेच १० डिसेंबर २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल
अधिकाऱ्यांना मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. शौचालय ही सोयीची नव्हे, तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक मूलभूत सुविधा आहे, असे त्यांनी नमूद केले.
नक्की वाचा : अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : आमदार संग्राम जगताप
सार्वजनिक शौचालयांची तत्काळ दुरुस्तीचे निर्देश (Swachh Bharat Mission)
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामांमधील वैयक्तिक तसेच सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल आणि सुशोभीकरण यावर विशेष भर देण्यात येणार आहे. अपूर्ण अथवा दुरुस्तीस आवश्यक असलेल्या सार्वजनिक शौचालयांची नोंद घेऊन त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आले आहेत.
या कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयं-सहाय्य गट, युवक मंडळे, भूतपूर्व सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण आणि हवामान-अनुकूल स्वच्छता या विषयांवर व्यापक जनजागृती राबविण्यात येईल. ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण व नियमित देखभाल करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
२१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. मोहिमेच्या अंतिम टप्प्यात उत्तम देखभाल आणि सुशोभीकरण केलेली वैयक्तिक व सामुदायिक शौचालये यांची निवड करून त्यांना विशेष गौरव देण्यात येईल. १० डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून उत्कृष्ट शौचालय पुरस्कार जाहीर करण्यात येतील. या मोहिमेत सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी केले आहे.


