
Parner Police Station : नगर : ठेकेदाराने केलेल्या रस्त्याचे कामाचे बील काढण्यासाठी ६५ हजार ६०० रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या (ZP) बांधकाम विभागाचा उपअभियंता अजय विठ्ठल जगदाळे, पंचायत समितीतील बांधकाम विभागातील रोजगारहमी पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी तसेच तांत्रिक सहाय्यक दिनकर दत्तात्रय मगर या तिघांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने रंगेहात पकडले आहे. पारनेर पंचायत समिती कार्यालयात २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून तिघांवर पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई
६५ हजार ६०० रुपयांची मागणी
तक्रारदार यांच्या नातेवाईकांची ठेकेदार संस्था असून त्या संस्थेचा कारभार तक्रारदार हे पाहतात. त्यांच्या संस्थेला मातोश्री ग्राम समृध्दी पाणंद रस्ते योजना या योजनेतुन कारेगाव (ता. पारनेर) येथील कारेगाव ते वाघोबा रस्ता खडीकरण व मजबुती करण्याचे काम मिळाले होते. या कामाचे मोजमाप करून कामाची बिले तयार करून ते मंजुरी करीता पाठविण्याचे काम यातील उपअभियंता अजय जगदाळे व तांत्रिक सहाय्यक दिनाकर मगर यांचे होते. हे बील मंजुरी करीता रोजगार हमी पॅनल तांत्रिक अधिकारी विलास चौधरी यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतः करीता तसेच अजय जगदाळे व इतर अशा तिघांकारिता सर्व मिळून ६५ हजार ६०० रूपये लाचेची मागणी केली.
नक्की वाचा : वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही तयार : अभिषेक कळमकर
कामाची बिले मंजुरी करीता लाचेची मागणी (Parner Police Station)
या बाबतची तक्रार नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने १८ नोव्हेंबर रोजी येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान यातील चौधरी यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे कामाचे मोजमाप करून कामाची बिले तयार करून ते मंजुरी करीता पाठविण्याकरीता ६५ हजार ६०० रूपयांची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कार्यालय, पारनेर येथे सापळा कारवाई दरम्यान चौधरी यांनी स्वतः करीता व उपअभियंता जगदाळे यांचे करीता दिनकर मगर यांचे करवी तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष ६५ हजार ६०० रूपये लाच स्विकारली. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारून शेख यांच्या पथकाने केली.


