Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या लढती निश्चित; आता धडाडणार प्रचाराच्या तोफा

Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या लढती निश्चित; आता धडाडणार प्रचाराच्या तोफा

0
Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या लढती निश्चित; आता धडाडणार प्रचाराच्या तोफा
Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या लढती निश्चित; आता धडाडणार प्रचाराच्या तोफा

Election : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ नगरपालिका व एक नगरपंचायत मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या (Election) लढती आज (ता. २१) निश्चित झाल्या. या १२ ही सार्वत्रिक निवडणुकीतील अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी प्रक्रिया संपली. त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. उद्या सकाळपासून प्रभागांत प्रचाराच्या (Election Campaigning) तोफा धडाडणार आहेत. १२ नगराध्यक्षपदासाठी (Mayor) ८६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर १९३७ उमेदवार नगरसेवक पदासाठी नशीब अजमावत आहेत.

अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई

काही नगरपालिकांत महायुतीत विभाजन

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, राहाता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड येथे पालिकांची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यंदा नागरिकांतून थेट नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. त्यामुळे निवडणूक ऐन रंगात आली आहे. जिल्ह्यातील काही नगरपालिकांत महायुतीत विभाजन दिसून आले आहे. यात श्रीरामपूर, शेवगाव, कोपरगाव येथील नगरपालिकांचा समावेश आहे. भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार परस्पर विरोधात मैदानात आहेत. त्यामुळे महायुतीत आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात काँग्रेस शक्तिहीन झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जात असलेल्या संगमनेरमध्ये थोरात-तांबे गटाने चक्क नवीन विकास आघाडी तयार करत काँग्रेसच्या पक्ष चिन्हाला बाजूला केले आहे.

नक्की वाचा : वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही तयार : अभिषेक कळमकर

श्रीरामपुरात नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवार (Election)

श्रीरामपुरात माजी आमदार जयंत ससाणे यांचे पूत्र करण ससाणे काँग्रेसतर्फे मैदानात उतरले आहेत. काँग्रेस पक्षाला त्यांच्याकडून मोठी आशा आहे. श्रीरामपूरमध्ये भाजपचे प्रकाश चित्तेंनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे श्रीरामपुरात भाजपचे श्रीनिवास बिहाणी व शिवसेनेचे प्रकाश चित्ते यांच्यात लढत होणार आहे. या लढतीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसचे ससाणे प्रयत्नरत असल्याची चर्चा आहे. श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल २७४ उमेदवारी अर्जांपैकी २७ उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी माघार घेतली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकपदासाठी १४८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत. नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे) व शिवसेना(उबाठा) या पक्षांचे उमेदवार आमनेसामने असून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.


शेवगावमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विद्या गाडेकर यांनी बंड केले आहे. त्या अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या पत्नी माया मुंढे या शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उमेदवारी करत आहेत. यातच भाजपनेही स्वतंत्र उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे येथेही महायुतीत कटुता दिसून येत आहे. यातच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे.

 
संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांच्या विरोधात आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ या निवडणूक रिंगणात आहेत. संगमनेर नगरपालिकेवर मागील ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून थोरात-तांबेंची सत्ता आहे. या सत्ताकारणाला खताळांनी आव्हान दिले आहे. 


कोपरगाव नगरपालिकेत कोल्हे व काळे गटाने परस्पर विरोधी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. गोदावरी नदी कोपरगाव शहरातून जात असूनही या शहरातील निवडणुकीत पाणी व रस्ते हे प्रचाराचा मुद्दे ठरत आहेत.

जामखेडमध्ये सर्व पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले असल्याने आघाडी व युती झाली नाही. त्यामुळे पहिल्या नगराध्यक्षा प्रिती राळेभात अपक्ष उमेदवारी करत आहेत.

राहाता नगर परिषदेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी १ नगराध्यक्ष पदाचा तर १८ नगरसेवक पदाचे अर्ज माघारी घेतले गेल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात सात नगराध्यक्ष पदासाठी तर ८० नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी महायुतीचे डॉ. स्वाधीन किसनराव गाडेकर, राहाता शहर विकास आघाडीचे धनंजय श्रावण गाडेकर,रासपचे बाळासाहेब सखाराम गिधाड, आम आदमी पार्टीचे रामनाथ भाऊराव सदाफळ,बहुजन पार्टीचे अनिल दगडू पावटे, अपक्ष भानदास बकाजी गाडेकर, अपक्ष तुषार गणेश सदाफळ हे सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

शिर्डी येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने आपला अधिकृत उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी १० उमेदवारांपैकी ३ अर्ज माघारी घेतल्याने ७ उमेदवार मैदानात आहे तर नगरसेवक पदासाठी ३६ अर्ज माघारी घेतल्याने आता ६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १४ उमेदवारांनी माघार घेतली. यात २ नगराध्यक्ष पदाचे तर १२ नगरसेवक पदाचे उमेदवारांचा समावेश असून यामुळे संपूर्ण निवडणूक समीकरणच बदलले आहे. विशेष म्हणजे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आता पूर्णपणे रिंगणाबाहेर गेली असून त्यांच्या दोन्ही उमेदवारांच्या माघारीमुळे हा पक्ष निवडणुकीतून बाद झाला आहे. पाथर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अभय आव्हाड (भाजपा), बंडू पाटील बोरुडे (राष्ट्रवादी,शरदचंद्र पवार पक्ष), संजय भागवत (राष्ट्रवादी,अजित पवार), नागेश लोटके (आप),अमोल गर्जे (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून नगराध्यक्ष पदाचा तिढा न्यायालयात गेल्याने २५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी असणार आहे.

शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या अंतिम उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण सहा उमेदवारांनी अंतिम यादीत स्थान मिळवले असून त्यांच्या नावे, पत्ते आणि निवडणूक चिन्हांची घोषणा करण्यात आली आहे. याद्वारे निवडणुकीची रंगत अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट पडली असून नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार आहे. महायुती मधील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे श्रीगोंद्यात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने नगरपरिषद निवडणुकीसाठी श्रीगोंद्यात होणारी चौरंगी लढत होणार आहे.