
Human-Leopard Conflict : नगर : अहिल्यानगर वनविभागात (Forest Department) सुमारे १ हजार १५० बिबट्यांची अंदाजित संख्या असून ऊस, मका, नेपिअर गवत, फळबागांचे क्षेत्र व पाण्याची उपलब्धता यामुळे बिबट्यांचा (Leopard) अधिवास मानवी वस्तीजवळ निर्माण होत आहे. जिल्ह्यातील मानव–बिबट संघर्ष (Human-Leopard Conflict) रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने कारवाई सुरू आहे. बिबट्यांना तत्काळ जेरबंद करण्यासाठी राहुरी व संगमनेर येथे दोन प्रशिक्षित रेस्क्यू टीम तैनात आहेत. अलीकडील काळात मानवावर हल्ला करणाऱ्या २३ बिबट्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे.
अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा
उपवनसंरक्षक यांच्याकडून घेतला हाेता आढावा
खारे–कर्जुने परिसरातील दोन बिबट्यांना जेरबंद करून त्यांना माणिकडोह (ता. जुन्नर) येथील निवारा केंद्रात कायमस्वरूपाने ठेवण्यात आले आहे. तर कोपरगाव तालुक्यातील येसगाव–टाकळी परिसरातील नरभक्षक ठरलेल्या एका बिबट्याला गोळी झाडून ठार करण्यात आले आहे. अहिल्यानगर वनविभागातील वाढत्या मानव–बिबट संघर्ष रोखण्यासाठी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्याकडून आढावा घेतला.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार
वनविभागाकडून उपाययाेजना (Human-Leopard Conflict)
पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजनातून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून ३०० पिंजरे, ३०० ट्रॅप-कॅमेरे, रेस्क्यू उपकरणे (जॅकेट, शूज, टॉर्च-गन, संरक्षणात्मक किट) आणि १४ रेस्क्यू वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ट्रॅप-कॅमेऱ्याद्वारे बिबट्यांच्या हालचालींची नोंद दैनंदिन घेतली जाते. संवेदनशील रस्त्यालगतचा झाडोरा हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. वनविभागाने वारंवार घटना घडणारी ८९७ संवेदनशील गावे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविली असून त्यानुसार या गावांतील शाळांची वेळ बदलून सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.०० अशी निश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पहाटे किंवा उशिरा सायंकाळी प्रवास करावा लागू नये.सध्या वनविभागाकडे ३०५ पिंजरे आणि ३ थर्मल ड्रोन उपलब्ध असून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून त्यांचा वापर करण्यात येतो. राहुरी वनपरिक्षेत्रातील बारागाव नांदूर येथे वन्यप्राणी उपचार केंद्र उभारणी अंतिम टप्प्यात असून जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होईल. याच ठिकाणी बिबट रेस्क्यू सेंटर स्थापन करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मानवहल्ल्यात सहभागी, जखमी प्राणी तसेच पिल्ले येथे उपचारानंतर आवश्यकतेनुसार ठेवण्यात येणार आहेत.
अहिल्यानगरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन बिबट नसबंदी व रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे ओळख होणारी सूक्ष्मचिप शरीरात प्रत्यारोपित करण्यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या बिबट्यांना वनतारा (गुजरात) प्रकल्पासह इतर निवारा केंद्रांमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याबाबत परवानगी मागितली आहे. यासंदर्भातील सुमारे ५०० बिबट्यांच्या टप्प्याटप्प्याने स्थलांतराचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विचाराधीन असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.


