
Constitution Awareness Festival : नगर : अहिल्यानगर शहरातील सीएसआरडी महाविद्यालयात (CSRD College) उद्या (ता. २६) संविधान दिनानिम्मित्ताने संविधान जागर महोत्सवाचे (Constitution Awareness Festival) आयोजन करण्यात आले आहे. मानवाधिकार अभियान व सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, सहायक आयुक्त कार्यालय समाजकल्याण विभाग (Social Welfare Department) यांच्या संयुक्त विद्यमाने व अहिल्यानगर जिल्ह्यातील समविचारी संस्था, संघटना, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून हा महोत्सव होणार आहे. शहरातील माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी साडेनऊ वाजता संविधान सन्मान रॅलीने या महोत्सवाची सुरुवात होईल.
नक्की वाचा : मानवावर हल्ला करणारे २३ बिबटे जेरबंद; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई
सुभाष वारे यांची महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी निवड
या महोत्सावाच्या आयोजनाच्या दृष्टीकोनातून संविधान जागर महोत्सव समन्वय समितीची बैठक नुकतीच झाली. मावळते स्वागताध्यक्ष अशोक सब्बन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व संविधान प्रचारक सुभाष वारे यांची संविधान जागर महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीस मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड, संध्या मेढे, सॅम्यूएल वाघमारे, प्रा.मेहबूब सय्यद, युनिस तांबटकर, अबीद शेख, संजय झिंजे, कॉ. भैरवनाथ वाकळे, दीपक अमृत आदी समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज द्या ; शेतकऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन*
संविधानातील मूल्ये समाजात रुजावण्यासाठी कार्यरत (Constitution Awareness Festival)
सुभाष वारे गेली तीन दशकांहून अधिक काळ राज्यभर संविधान जागृती, महापुरुषांचे विचार आणि पुरोगामी विषयांवर व्याख्याने व प्रशिक्षण सत्रे घेत आहेत. त्यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग देत नेतृत्वही केले आहे. संविधानातील मूल्ये समाजात रुजावीत यासाठी ते सतत कार्यरत आहेत. सुभाष वारे यांची सामाजिक प्रवासाची सुरुवात छात्रभारती या विद्यार्थी संघटनेतून झाली. बहुजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि छात्रभारतीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. वयाच्या २६व्या वर्षापासून ते समाजवादी चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहेत. राष्ट्र सेवादलचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी देशभरातील युवकांशी व्यापक संवाद साधला.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जन्मशताब्दी वर्षात स्थापन झालेल्या भूमी हक्क समितीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जमीन हक्काच्या प्रश्नावर महत्वाचे काम केले. भारतीय संविधानातील मूल्यव्यवस्था हा त्यांचा अभ्यासाचा आणि आस्थेचा विषय असून संविधान साक्षरता अभियानांतर्गत त्यांनी दोनशेहून अधिक शिबिरांसह हजारहून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या “आपले भविष्य भारतीय संविधान” या पुस्तकाच्या पंचेचाळीस हजार प्रती आजवर विकल्या गेल्या आहेत. किल्लारी भूकंपानंतर छात्रभारती व महाराष्ट्र आरोग्य मंडळ यांच्या माध्यमातून भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी झालेल्या अभियानात त्यांनी संयोजक म्हणून काम केले. १९९६ ते १९९९ या काळात महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या भीमाशंकर आदिवासी विकास प्रकल्पाचे संयोजक म्हणून त्यांनी कार्य केले. २००२ मध्ये हडपसर येथे झालेल्या राष्ट्र सेवादल हिरक महोत्सवी मेळाव्याचेही ते प्रमुख संघटक होते. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना मदत आणि मार्गदर्शन देणाऱ्या “सामाजिक कृतज्ञता निधी” या न्यासाचे ते विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. संविधान जागर महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांनी निवड झाली आहे.
संविधान जागर महोत्सवाविषयी अधिक माहिती देतांना मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी सांगितले कि, मानवाधिकार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. संविधान जागर महोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष आहे. याही वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्सवाच्या स्वरुपात साजरा करण्याचा मानवाधिकार अभियान तसेच जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संस्था संघटना यांचा मानस असून यावर्षी संविधान जागर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार संविधान जागर महोत्सवाअंतर्गत यावर्षी संविधान रॅलीच्या सोबतच साविधनाचा अधिकाधिक प्रचार व्हावा म्हणून संविधान जागर रथ, पथनाट्य, संविधान गीते, प्रबोधनपर व्याख्याने, चर्चासत्रे, शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी या स्वरुपात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन
२६ नोव्हेंबरला संविधानदिनी सकाळी साडेनऊ वाजता अहिल्यानगरच्या माळीवाडा बस स्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून “संविधान सन्मान रॅली” सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅली सुरू होईल. माळीवाडा भागातील महात्मा फुले पुतळ्यास अभिवादन करून पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचा समारोप होईल. त्यानंतर सीएसआरडी महाविद्यालयात “संविधान सन्मान सभा” होईल.


