Election Adjudicating Officer : नगर : कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये एका राजकीय पक्षाच्या नगराध्यक्षपद (Mayor Post) व नगरसेवक पदांसाठी दाखल उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याबाबत जिल्हा न्यायालयात (District Court) दाखल अपीलावर सुनावणी झाली. कोपरगाव न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. डी. डी. आलमाले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची (Election Adjudicating Officer) भूमिका ग्राह्य धरत अपील फेटाळले. यामुळे संबंधित पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे आणि २८ नगरसेवक पदांचे उमेदवार निवडणुकीत लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नक्की वाचा : मानवावर हल्ला करणारे २३ बिबटे जेरबंद; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई
पूर्वग्रहदूषित भूमिका नव्हती हे स्पष्ट
या प्रकरणातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सचोटी, प्रामाणिकता, प्रशासकीय कौशल्य आणि निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेची कसोटी लागली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत कोणतीही प्रक्रिया-त्रुटी नसल्याचे आणि पूर्वग्रहदूषित भूमिका नव्हती हे स्पष्ट केले.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज द्या ; शेतकऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन
शेवटच्या २ तासांत १२५ अर्ज दाखल (Election Adjudicating Officer)
कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भारती सागरे (गायसमुद्रे), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास जगताप यांचेसह निवडणूक शाखा काम पाहत आहेत. अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी (ता.१७) शेवटच्या दोन तासांत तब्बल १२५ उमेदवारी अर्ज दाखल झाले, ज्यांची प्राथमिक तपासणी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होती.
छाननी व हरकती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर २३७ अर्जांपैकी ५६ अर्ज हरकत आणि पात्रता तपासणीमुळे अवैध ठरले. नंतर एका राजकीय पक्षाने प्रतिज्ञापत्रावरील स्वाक्षरीबाबत आक्षेप घेत कोर्टात अपील दाखल केले. २२ व २३ नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. सुनावणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी छाननीच्या वेळी अपीलकर्त्यांनी कोणतीही लेखी अथवा तोंडी हरकत नोंदवली नव्हती, असे स्पष्ट सांगितले. “भारतीय लोकशाहीची मूल्ये जपत किरकोळ कारणावर उमेदवारांना अपात्र ठरवणे योग्य ठरणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.



