Kidnapping : श्रीरामपूर: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर (Sachin Gujar) यांचे आज (ता.२६) सकाळी अपहरण (Kidnapping) करून त्यांना बेदम मारहाण (Brutal Beating) करण्यात आली. त्यानंतर गुजर यांचा मोबाईल फोडून टाकून त्यांना निर्जनस्थळी सोडून देण्यात आले. श्रीरामपूर शहरात बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.
नक्की वाचा : प्रा. राम शिंदे यांच्याविरुध्द अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरे यांना हक्कभंगाची नोटीस
व्हिडीओ व्हायरल करत मारहाणीचे समर्थन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गुजर यांनी अवमानकारक वक्तव्य केले म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे शिवप्रहार प्रतिष्ठानचे चंद्रशेखर आगे यांनी आपणच गुजर यांना मारहाण केल्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल करत मारहाणीचे समर्थन केले आहे. ऐन नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या दरम्यान ही घटना घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अवश्य वाचा: श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला
अपहरणाची घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद (Kidnapping)
मारहाणीनंतर सचिन गुजर यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार करण ससाणे यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठत संबंधित हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अपहरण करण्यात आल्याची ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. सचिन गुजर नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पाडले होते. तेव्हा घरापासून काही अंतरावर एका कारमधून आलेल्या व्यक्तींनी त्यांना अडविले व जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेल्याचे त्यात दिसत आहे. त्यानंतर गुजर यांना शहरापासून काही अंतरावरील रस्त्यावर निर्जन ठिकाणी सोडून देण्यात आले व त्यांचा मोबाईलही फोडून टाकण्यात आला. या मारहाणीच्या घटनेने श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.



