
Kumbh Mela : कर्जत: तपोवन नाशिक (Nashik Kumbh Mela) परिसरात होणाऱ्या वृक्षतोडीवर (Tree Felling) सरकारने योग्य तो सकारात्मक तोडगा काढावा. जुनी इतिहासकालीन झाडे त्या भागाची नैसर्गिक वनसंपत्ती असून त्याचे जतन सर्वांची नैतिक जबाबदारी बनते. त्यामुळे सरकारने वृक्षतोड न करता कुंभमेळा (Kumbh Mela) साजरा करावा, अशी मागणी कर्जतच्या सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमींनी केली. याबाबत कर्जतचे तहसीलदार रवी सतवन यांना निवेदन देण्यात आले.
अवश्य वाचा: धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले; रासप आमदाराच्या दाव्याने खळबळ
वृक्षसंपदा ही शहराची अमूल्य नैसर्गिक संपत्ती
गेल्या पाच वर्षाहून अधिक काळापासून कर्जत येथे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन कार्य करणाऱ्या सर्वसामाजिक संघटनेने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीअंतर्गत साधुग्राम उभारणीसाठी तपोवन परिसरातील झाडे तोडण्याची शक्यता सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. तपोवन हा परिसर धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असून तेथील शेकडो वर्षे जुनी वृक्षसंपदा ही शहराची आणि परिसराची अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे.
नक्की वाचा : रोहित पवारांना त्यांचा पराभव दिसू लागलाय; राम शिंदेंनी साधला निशाणा
शेकडो वर्ष जुनी झाडे तोडणे हा दुटप्पीपणा (Kumbh Mela)
साधू-संतांच्या मुक्कामासाठी निसर्गाच्या सान्निध्यापेक्षा योग्य अन्य व्यवस्था होऊ शकत नाही. म्हणूनच साधुग्राम उभारण्याचे कारण देऊन वृक्षतोड करणे हे निसर्गविरोधी, अवैज्ञानिक आणि पर्यावरणाची अपरिमित हानी करणारे पाऊल आहे. एकीकडे राज्य सरकार “झाडे लावा – झाडे जगवा” या मोहिमेवर कोट्यवधी निधी खर्च करीत असताना, दुसरीकडे नियोजनाच्या त्रुटींमुळे शेकडो वर्ष जुनी झाडे तोडण्याची वेळ येणे हा दुटप्पीपणा आणि पर्यावरण संरक्षण धोरणाला हरताळ फासणारा आहे. त्यामुळे सदर वृक्षतोड निर्णय निंदनीय असून निषेधार्थ आहे.

पर्यायी मोकळ्या जागेचा विचार करण्यात यावा (Kumbh Mela)
सरकारने साधुग्रामसाठी तपोवनातील झाडे न तोडता पर्यायी मोकळ्या जागेचा गंभीरपणे विचार करण्यात यावा. अस्तित्वातील झाडांना धक्का न लावता त्यांच्या सावलीत आणि परिसरातच पर्यावरणपूरक तात्पुरत्या सुविधा उभारण्यात याव्यात. आगामी सिंहस्थ कुंभमेळा “हरित कुंभ ” म्हणून साजरा व्हावा यासाठी आवश्यक पर्यावरणीय नियोजनाची अंमलबजावणी करण्यात यावी. तपोवन परिसरातील वृक्षांची वैज्ञानिक तपासणी, मोजणी व संरक्षणाचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा. वृक्षतोडीविरुद्ध पर्यावरणप्रेमी नागरिक व संघटनांनी सूचविलेल्या पर्यायी जागांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.


