Abhishek Kalamkar : नगर: आगामी निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदार यादी (Voter List) जाहीर केली आहे. या यादीत अनेक त्रुटी आढळून आल्याचे दिसत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेकांनी हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतीवर संबंधित प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
नक्की वाचा : टीईटी सक्ती रद्द करा; शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
सत्ताधारी उमेदवारांना फायदा होईल अशी प्रभागाची तोडफोड
महापालिका प्रशासनाकडे नऊ हजार ९६० हरकती दाखल झाल्या आसुन या यादीत अनेक त्रुटी असल्याचे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना व पक्षाला फायदा होईल असे जेरी मॉडेरिंग पद्धतीने महापालिकेच्या प्रभागाची तोडफोड करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनावर दडपण आणून सत्ताधाऱ्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप कळमकर यांनी केला आहे. या प्रारूप मतदार यादीचा अभ्यास केला असता अनेक विसंगती आढळून येत आहेत, शेकडो मतदार एकाच पत्त्यावर आहेत. तर काहींच्या वयांची तसेच नावांची ही तफावत असल्याचे या यादीमध्ये दिसत आहे. महिला पुरुष लिंग बदल ही करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच तीन महिलांच्या पतीचे नाव हे एकच असल्याचे मतदार यादी मध्ये दिसत आहे. काही मतदारांचे आडनाव नसल्याचेही दिसून येत आहे. तसेच हिंदू मुस्लिम हे एकाच घरात राहत असल्याचे ऐक्याचे प्रतीक या मतदार यादीतून पुढे आले आहे.
अवश्य वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई
अनेक घाेळ असल्याचा आराेप (Abhishek Kalamkar)
श्रीगोंदा मतदार संघातील ४३०० नावे महापालिकेच्या मतदार यादीत नोंदविण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याबाबत आयुक्तांना तसे पुरावे ही देण्यात आले असून, ही नावे वगळण्यात यावी अशी हरकतही महापालिका आयुक्त तसेच निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. एक १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, या यादीत हरकतीनुसार नावे न वगळल्यास आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपला लढा हा अहिल्यानगर शहरातील मतदारांच्या न्याय हक्कासाठी आहे. या मतदार यादीचा जो गोंधळ आहे याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुबार नावे ही वगळता येत नाही असे असे निवडणूक आयोग म्हणते, तर दुसरीकडे डबल वोटिंग झाल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आयोग म्हणते, मग दुबार मतदान करणाऱ्यावर निवडणूक आयोग गुन्हा दाखल करणार का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मतदार यादी पारदर्शक व निष्पक्ष व्हावी यासाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याचेही अभिषेक कळमकर म्हणाले.



