
Ladki Bahin Yojana : पाथर्डी: जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार नाही. उलट काहींना आम्ही लखपती दीदी करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले. पाथर्डी येथील वीरसावरकर मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), आमदार मोनिका राजळे, सुरेश धस, दिलीप भालसिंग, अनिल मोहिते, अक्षय कर्डीले, सुवेंद्र गांधी, विवेक नाईक, राहुल राजळे, धनंजय बडे, दिगंबर भवार, अभय आव्हाड उपस्थित होते.
विविध योजना राबवून शहरांचा विकास
फडणवीस म्हणाले, राज्यात साडेसहा कोटी लाडक्या बहिणी असल्या तरीही विधानसभेच्या सभागृहात माझ्या पाठीशी राहणाऱ्या राजळे या खऱ्या लाडक्या बहीण आहेत. त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांनीच मला राजकारणात पुढे आणण्याचे काम केले. सात दशके देशावर राज्य करणाऱ्यांनी शहराकडे दुर्लक्ष केले होते. मोदी सत्तेवर आल्यानंतर शहरासाठी स्मार्ट सिटी, हर घर जल, अशा विविध योजना राबवून शहरांचा विकास करण्यात आला.
ही निवडणूक योजना तुमच्यापर्यन्त पोहोचवण्यासाठी (Ladki Bahin Yojana)
शहरात आलेल्या अनेकांनी जागा मिळेल तेथे घरे, झोपड्या बांधल्या. ज्यांनी अशी अतिक्रमणे केली ती नियमित करण्याचे काम आम्ही करत पंतप्रधान आवास योजनेतून या लोकांची घरे बांधून दिली. भूमिगत गटार योजना का राबवता असे म्हणाऱ्याची मला किंवा येते. या योजनेमुळे शहराचे आरोग्य सुधारते, या कामासाठी रस्ते खोदले गेले असले तरीही नवीन रस्त्यासाठी निधी देण्यात आला आहे. शहरातील लोकांना नियमित पाणी व वीज मिळावी, प्रदूषणमुक्त शहरे निर्माण करणे ही कामे आम्ही हाती घेतली आहे. ही निवडणूक पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी नाही तर केंद्र व राज्याच्या योजना तुमच्या पर्यन्त योग्य व्यक्तींच्या हातून पोहोचवण्यासाठी या ठिकाणी भाजपला सत्ता द्या. वकील संघाने न्यायालयासाठी नवीन इमारतीची मागणी केली आहे ती आपण पूर्ण करू असे फडणवीस म्हणाले. प्रास्तविक आमदार मोनिका राजळे, सूत्रसंचालन राजू सुरवसे तर आभार धनंजय बडे यांनी मानले.


