Nagarpalika Elections Results: अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची सरशी! विरोधकांची वाताहत

0
Nagarpalika Elections Results:अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची सरशी! विरोधकांची वाताहत
Nagarpalika Elections Results:अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची सरशी! विरोधकांची वाताहत

Nagarpalika Elections Results: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील १२ नगरपालिका (Nagapalika Elections) व नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल (Elections Result) आज लागले. अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची सरशी (BJP’s victory) झाली असून विरोधकांची वाताहात झाली आहे. यामध्ये राहाता नगर परिषदेसाठी 2 डिसेंबरला मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणी भाजपच्या विखे गटाचे डाॅ.स्वाधिन गाडेकर हे नगराध्यक्षपदासाठी दणदणीत विजयी झाले. या पालिकेवर अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. 20 पैकी 19 जागांवर विखे पाटील गटाने विजय मिळवत या पालिकेवर सत्ता राखली.

अहिल्यानगर जिल्ह्यात आज (दि. 21) 11 नगरपालिका व एक नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया झाली. जामखेड वगळता सर्व ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया शांततेत झाली. या निवडणुकीत भाजप 7, शिवसेना शिंदे गट 2, काँग्रेस 1 तर अपक्ष 2 जण नगराध्यक्ष झाले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनून समोर आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्रित निवडणूक न लढविल्याचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. याच आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री शंकरराव गडाख व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अपक्ष निवडणूक लढविल्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा कमी झाल्याचे दिसून आले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डी व राहात्याचा गड राखला.

नक्की वाचा: निवडणूक आयोगाने थेट बोली लावूनच भाजपच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं; रोहित पवारांची टीका 

विखेंनी गड राखला (Nagarpalika Elections Results)

नगराध्यक्षपदासाठी भाजपचे डॉ. स्वाधिन गाडेकर विरुद्ध लोकक्रांती सेनेचे धनंजय गाडेकर यांच्यात मुख्य लढत झाली. दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीत ताकद लावली असली तरी पालकमंत्री विखेंची जादू पुन्हा एकदा दिसली. नगराध्यक्षपदासाठी डॉ. स्वाधीन गाडेकर हे सुमारे 4660 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. विखेंनी पुन्हा आपल्या बालेकिल्ल्यात ऐतिहासिक विजय मिळवला. सुरुवातीपासून ही निवडणूक एकतर्फी होईल, असे भाकीत वर्तवले जात होते. निकालानंतर विखेच सबकुछ आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपच्या जयश्री विष्णू थोरात 4940 मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या माधुरी थोरात व शिवसेना उबाठा गटाच्या भाग्यश्री सावकारे होत्या. शिर्डीत पुन्हा एकदा विखेंचीच जादू चालते, हे सिद्ध झाले. या निवडणुकीपूर्वी जयश्री थोरात या यापूर्वीही नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.

अवश्य वाचा: शुभमन गिलला संधी न देण्याचं कारण काय? अजित आगरकरांनी एका वाक्यात विषय संपवला 
शिर्डीकरांनी थोरात व विखेंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे दिसले. शिर्डीची निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसले.अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या विकासावर शिर्डीकरांनी भरभरुन मतदान दिले. जगविख्यात देवस्थान असलेल्या शिर्डी पालिकेवरा यानिमित्ताने पुन्हा एकदा विखेंचा झेंडा फडकल्याचे दिसले.
शेवटपर्यंत अतितटीच्या राहिलेल्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर पालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली.

नगराध्यक्षपदासाठी भाजपचे सत्यजित कदम यांच्यावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला. सत्यजित कदम हे बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत भाजपचे 15 नगरसेवक निवडून आले. विरोधी काँग्रेसला 4 जागांवर समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेचा एक-एक नगरसेवक निवडून आला. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यावर देवळालीतील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे या निकालानंतर दिसले. 

पाथर्डी पालिकेसाठी शनिवारी शांततेत 68.76 टक्के मतदान झाले. दहा प्रभागातून 20 नगरसेवक व 1 नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक झाली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या सभेने वातावरण फिरवले. आमदार मोनिका राजळे यांची जादू पुन्हा एकदा चालल्याचे दिसले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अभय आव्हाड हे विजयी झाले. ही पालिका पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आल्याचे दिसले.

विरोधी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे यांनीही या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावला होता. परंतु विकासकामांच्या जोरावर आमदार मोनिका राजळे यांनी ही प्रतिष्ठेची झालेली पालिका पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता, शिर्डी, देवळाली व पाथर्डी या पालिकांवर भाजपचे कमळ फुलल्याचे दिसले.

श्रीगोंद्यात भाजपच्या सुनीता खेतमाळीस विजयी (Nagarpalika Elections Results)

अत्यंत चुरशीच्या झालेल्या श्रीगोंदा पालिका निवडणुकीसाठी चौरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपच्या सुनीता खेतमाळीस यांनी बाजी मारली. चौरंगी लढतीत आमदार विक्रम पाचपुते यांची जादू पुन्हा एकदा चालल्याचे दिसले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात भाजपने दमदार वाटचाल सुरु ठेवल्याचे दिसले. माजी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शुभांगी पोटे यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

आमदार पाचपुते यांच्यावर श्रीगोंदेकरांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवल्याचे दिसले. भाजपच्या सुनीता खेतमाळीस यांचा नगराध्यक्षपदाच्या लढतीत 1075 मतांनी विजय झाला. श्रीगोंद्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि सक्षम नेतृत्वावर दाखवलेला हा विश्वास निश्चितच अभिमानास्पद आहे. नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केला.

शेवगाव पालिका निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या माया अरुण मुंडे या नगराध्यक्षपदासाठी विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या विद्या लांडे, भाजपच्या रत्नामाला फलके आणि शरद पवार गटाच्या परवीन काझी यांना पराभवाचा सामना करावा लागला. शेवगाव पालिका निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना हे महायुतीचे तिन्ही पक्ष समोरासमोर होते. तर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटही नशीब अजमावत होता.

या ठिकाणी भाजपचे नेतृत्व आमदार मोनिका राजळे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व माजी आमदार चंद्रशेखर घुले करत होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपचे नेते अरुण मुंडे यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरत नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्या पत्नीला मिळवून दिली. ही त्यांची चाल प्रचंड यशस्वी ठरल्याचे दिसले. माया मुंडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या राहुरी नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी तनपुरे गटाच्या विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे विजयी झाले. भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत विकास आघाडाने 17 जागांवर विजय मिळवला. तर भाजपच्या हाती फक्त 7 जागा लागल्या.या निवडणुकीत राहुरीकरांनी पुन्हा एकदा तनपुरेंवर विश्वास दाखवल्याचे दिसले. आमदार  शिवाजीराव कर्डिेल यांच्या अकस्मात निधनानंतर पालिकेवर कुणाची सत्ता येईल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. तनपुरे गटाने दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र करत, ही निवडणूक लढवली होती. शेवटपर्यंत चुरशीच्या राहिलेल्या नेवासा नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान झाले.

रविवारी 21 डिसेंबरला निकालापर्यंत या पालिका निवडणुकीची रंगत कायम असल्याचे दिसले. गेल्या विधानसभेला पराभूत झालेल्या माजीमंत्री शंकरराव गडाखांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या झेंड्याखाली निवडणुकीत पूर्ण ताकद लावली होती. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत, शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांची जादू पुन्हा चालल्याचे दिसले. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले यांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या नंदकुमार पाटील यांचा पराभव केला. ही लढत अत्यंत अतीतटीची झाली. गडाख कुटुंबाने पूर्ण ताकद लावूनही त्यांना पराभवाला समोरे जावे लागले. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी शेवटपर्यंत ताकद लावल्याचे दिसले. परंतु आमदार लंघे यांची जादू पुन्हा एकदा चालली. लाडक्या बहि‍णींनी पुन्हा एकदा शिवसेनेवर विश्वास ठेवल्याचे दिसले.